पुन्हा वाघाचे अस्तित्व झाले सिद्ध
प्रतिनिधी / कोल्हापूर
‘चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने एका रेड्याची शिकार केली आहे. याचे सबळ पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत. पट्टेरी वाघाने रेड्याची शिकार करून त्याचा मागील भाग खाल्ला आहे. वाघाच्या या शिकारीमुळे वनक्षेत्रात वाघाचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. ज्या ठिकाणी रेड्याची शिकार झाली आहे, त्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. वनविभागाने ‘चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह झोन तयार केल्याने वाघाच्या अस्तित्व राखण्यास पूरकस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागचे कर्मचारी गस्त घालत असताना त्याना एका रेड्याच्या शिकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अर्धवट खालेल्या स्थितीत एक पूर्ण क्षमतेने वाढलेला मृत रेडा आढळून आला. त्याच्या मागील बाजूने वाघाने झडप मारून शिकार केली असावी असा अंदाज आहे. वाघाने रेड्याला अनेक फूट लांब फरफटत ओढत नेल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान मृत रेड्याच्या आजूबाजूला वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.