भारतीय परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव व केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती
1 लाख लोकांनी 100 रूपयांची मदत करावी : चांगुलपणाच्या चळवळीचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट, मालिका, माहितीपटांचे चित्रीकरण थांबले आहे. जमावबंदी असल्याने तमाशा, कलापथक, नाटक सादरीकरणाला बंदी आहे. त्यामुळे कलाकारांवर उपासमारीचे वेळ आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास आपल्या कलेतून जपणार्या कलाकारांना मदत करण्यासाठी `चांगुलपणाची चळवळ’ धावून येत आहे. जनतेच्या सहभागातून कलाकारांना मदत केली जाणार आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव व केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चित्रीकरणासह, चित्रकला, शिल्पकला, नाटककार, तमाशा, हस्तकला, रांगोळी आदी व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे कलावंत, पडद्यामागचे तंत्रज्ञ, चित्रकार, लेखक, यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील कलाकार जगला पाहिजे यासाठी `चांगुलपणाची चळवळ’ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यभरातील 1 लाख लोकांच्याकडून 100 रूपये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जमा झालेल्या रकमेतून कलाकारांना गरजेनुसार मदत केली जाणार आहे. किमान कलाकारांच्या उदरनिर्वाहाचे तात्पुरते साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी `गिव्हींग बॅक मिशन’ या उपक्रमास मदत करावी, असे आवाहनही चांगुलपणाची चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी
आपले मनोरंजन करणाऱया कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने 100 रूपये मदत करावी. 1 लाख लोकांनी 100 रूपये दिल्यास 1 कोटीची रक्कम जमा होईल. यातून अडचणीत सापडलेल्या कलावंताना मदतीचा हात मिळणार आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी.
-ज्ञानेश्वर मुळे (भारतीय परराष्ट्र खात्यातील निवृत्त सचिव व केंद्रिय मानवाधिकार आयोगाचे सदस्य).