प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये `संत गजानन शेगावचे’ या मालिकेच्या चित्रिकरणाला प्रारंभ झाला आहे. चित्रनगरीत भव्य सेट उभारला असून बहुतांश कलाकार स्थानिक असल्याने कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. पुढच्या आठवड्यात एक मालिका कोल्हापुरात येणार असून 26 ते 27 सप्टेंबरला या मालिकेचे चित्रिकरण सुरू होणार आहे, अशी माहिती अभिनेता आनंद काळे यांनी दिली.
कोल्हापुरातील कलाकार, निर्मार्ते, दिग्दर्शक यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुरात चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे. चित्रनगरीत सध्या मेहंदी है रचनेवाली',
संत गजानन शेगावचे’ या दोन मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रनगरीत दोन्ही मालिकांचे भव्य सेट उभारण्यात आले आहेत. तसेच कोल्हापूर परिसरात`जीव माझा गुंतला’ या मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. कोल्हापुरातील स्थानिक कलाकार, सहाय्यक दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कॅमेरामन आदींना रोजगाराची संधी मिळालेली आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या आठवड्यात येणाऱ्या मालिकेचे निर्मार्ते, दिग्दर्शक यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत. नवीन मालिकेच्या चित्रिकरणाला 26 ते 27 सप्टेंबरला सुरूवात होणार आहे. या मालिकांचे चित्रिकरण किमान दोन ते तीन वर्षे कोल्हापुरात सुरू राहिल असा अंदाज स्थानिक कलाकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना सलग तीन वर्षे रोजगार उपलब्ध होणार आहे.