जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
चिमुरडीस जीवे ठार मारण्याची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धास जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 एस. आर. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चंद्रकांत दत्तात्रय पेंडूरकर (वय 55 ता. करवीर जि. कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. अमृता पाटोळे यांनी न्यायालयात बाजू मांडली. डिसेंबर 2016 मध्ये करवीर तालुक्यात ही अमानुष घटना घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2016 मध्ये करवीर तालुक्यातील एका गावामध्ये एका चिमुरडीवर चंद्रकांत पेंडूरकर याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. चंद्रकांत पेंडूरकर याला अटक केल्यानंतर पिडीत चिमुरडीस जिवे ठार मारण्याची धमकी देत गावातील शाळेत व अन्यत्र तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणाचा तपास करवीर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांनी केला होता. तसेच चंद्रकांत पेंडूरकर याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षातर्फे ऍड. अमृता पाटोळे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच ऍड. पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून चंद्रकांत पेंडूरकर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 एस. आर. पाटील यांनी जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीतेस देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या तपासामध्ये पोहेका किरण माने, आर. डी. बंडगर, एम. एम. नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली.