प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री धाडसी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. संबंधीत चोरी शहरातील एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरुन त्यांच्या टोळीने केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
चोरीची फिर्याद पोलिसात दाखल झाल्यानंतर माजी नगरसेवकाने संबंधीत फिर्यादी व्यक्तीबरोबर संपर्क साधला. तु पोलिसात फिर्याद देवू नकोस. तुझे चोरी गेले साहित्याचे पैसे देतो, असे सांगून गुरुवारी रात्री राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आणत या चोरीत संबंधीत माजी नगरसेवकाचा हात आहे की नाही या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असून, एक दोन दिवसात या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून चोरट्यांचा कोणत्याही परिस्थितीत मुसक्या आवळण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.