पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रेतील घटना,तिघा संशयितांना अटक, संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर हल्ला, गावाला पोलीस छावणीचे रूप, संतप्त प्रतिक्रिया दोघेजण ताब्यात
नणुंद्रे ः महाविद्यालयीन युवतीच्या आत्महत्येनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
संशयित आरोपी ः प्रदीप पाटील, अजित पाटील, अक्षय चव्हाण.
वार्ताहर / कोलोली, पन्हाळा
गावातील तरुणांकडून सतत होणाऱया छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथे घडला. प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय 20) या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. सतत होणारी छेडछाड सहन न झाल्याने प्राजक्ताने 23 ऑक्टोबरला किटकनाशक प्राशन केले होते. शुक्रवारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यु झाला. त्यानंतर नणुंद्रे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने संशयित तीन आरोपींपैकी एका आरोपीच्या घरावर हल्ला केला. गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, मृत प्राजक्ताच्या आई वैशाली सुरेश बाऊचकर (वय 39) यांनी पन्हाळा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तिघा संशयितांना अटक करून गुन्हा नेंद करण्यात आला आहे. अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण, प्रदीप कृष्णात पाटील, (तिघे राहणार नणुदे ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
या घटनेची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी ः नणुंदे येथील प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय 20) ही गावाशेजारील महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षांत शिकत आहे. तिच्या वडिलांचे 10 वर्षांपुर्वी सर्पदंशानंतर निधन झाले. त्यानंतर आईसमवेत ती रहात आहे. अल्पभुधारक असलेल्या मायलेकींनी किराणा दुकानावर उदरनिर्वाह चालवला आहे. अभ्यासात हुशार असणाऱया प्राजक्ताने या बिकट स्थितीवर मात करत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास सुरूवात केली. गावाशेजारील कॉलेजमध्ये ती शिकत होती. महाविद्यालयातून घरी येताना संशयित तिघे तिची वारंवार छेड काढत होते, मोबाईलवरून फोन आणि मेसेज करून तिला त्रास देत होते. संशयितांकडून होणाऱया त्रासाची माहिती तिने आईलाही दिली होती.
संशयितांकडून होणाऱया सततच्या त्रासाला कंटाळून प्राजक्ताने 23 ऑक्टोबरला रहात्या घरी किटकनाशक प्राशन केले. तिला गंभीर अवस्थेत कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असता शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला, त्यामुळे सुरूवातीला आत्महत्त्येचा प्रयत्न अशी नोंद पन्हाळा पोलिसांत झाली होती, पण शुक्रवारी तिच्या मृत्यूची नोंद छेडछाडीला कंटाळून आत्महत्या अशी झाली आहे. तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघा संशयितांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी रात्री उशिरा दिली.
संशयिताचा आत्महत्त्येचा प्रयत्न, हॉस्पिटलमधून पलायन
प्राजक्ता महाविद्यालयातून घरी येत असताना तिची छेडछाड केल्याची तक्रार पन्हाळा पोलिसांत नोंद आहे. छेडछाडीमुळे होणाऱया मानसिक त्रासाला कंटाळून तिने 23 ऑक्टोबर रोजी किटकनाशक प्राशन केले होते. तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते. या घटनेतील एका संशयिताने दोन दिवसांपूर्वी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केला. त्याच्यावरही कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणीच्या मृत्यूनंतर संशयित हॉस्पिटलमधून पळून गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. नंतर त्याला अटक केल्याचेही सांगण्यात आले.
संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर हल्ला,
नणुंद्रेला पोलीस छावणीचे स्वरूप
प्राजक्ताचा उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याचे वृत्त गावात पसरताच तणाव निर्माण झाला. गावात संतापाची लाट उसळली. संशयित अजित पाटील याच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला करून प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली. त्यामुळे गावातील वातावरण आणखीन तणावपूर्ण बनले. त्यानंतर गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. रात्री गावात तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, शाहूवाडीचे पोलीस उपाअधीक्षक अनिल कदम, पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. डी. फडतरे यांनी भेट दिली. तसेच गावांत बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे रूप आले आहे.
आईच्या फिर्यादीनंतर संशयितांवर गुन्हा दाखल
प्राजक्ताने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई वैशाली सुरेश बाऊचकर (वय 39) यांनी पन्हाळा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी संशयित अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण, प्रदीप कृष्णात पाटील, (सर्व रा. नणुदे ता. पन्हाळा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
घरी जाणाऱया प्राजक्ताचा पाठलाग करून त्रास
वैशाली बाऊचकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या शुक्रवारी, 23 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास महाविद्यालयातून प्राजक्ता दुचाकीवरून घरी निघाली होती. यावेळी संशयित अक्षय चव्हाण, अजित पाटील, प्रदीप पाटील यांनी तिचा पाठलाग केला, तसेच कोतोली-तेलवे गावादरम्यान रोडवर तिला थांबवले. तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती तणावातच घरी आली. तिच्या मोबाईलवर संशयित मेसेज पाठवत होते. त्यामुळे छेडछाडीला कंटाळून तिने तणनाशक प्राशन करून आत्महत्त्येचा केले प्रयत्न केला होता. तिचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
संशयितांना कडक शासन करण्याची कुटुंबियांची मागणी
तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱया संशयितांना कडक शासन करावे, अशी मागणी बाऊचकर कुटूंबीयांनी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड अन् तिच्या आत्महत्त्येमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश पन्हाळा पोलिसांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
विनयभंग, आयटी ऍक्टखाली गुन्हा, चार मोबाईल जप्त
संशयितांवर विनयभंग, आत्महत्त्येस प्रवृत्त करणे, यासह मोबाईलवर वारंवार मॅसेज पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी मृत प्राजक्ताच्या मोबाईलसह संशयित तिघांचे मोबाईलही जप्त केले आहेत. त्यातील मॅसेजची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.