प्रतिनिधी / शिरोळ
२० जून रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार व्यक्तींनी चाकूने व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी करत राजू हनुमंता बनपट्टी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन गेल्याची घटना 21 जून रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर रोड वरील आगर फाटा येथे घडली. जखमीस जयसिंगपूर येथे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी राजू हनुमंता बनपट्टी पंचेचाळीस रा. शाहुनगर जयसिंगपूर हे मोटरसायकलवरून जेवण करण्यासाठी घरी जात असताना संशयित आरोपी हनुमंता नागाप्पा गाडीवर, संदीप भोसले, सुरज चौगुले सर्व राहणार जयसिंगपूर व अन्य एक अनोळखी व्यक्तीने असे चौघांनी मिळून चाकू दगडाने छातीवर डोक्यावर उजव्या बरकडीवर वार करून गंभीर जखमी केले, व बनपट्टी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेऊन शिवीगाळ करून पळून गेले आहेत.
जमलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी राजू बनपट्टी यास जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. सदर घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत माळी गजानन कोष्टी हे करीत आहेत.