जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची लसीकरण आढावा बैठकीत माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्याचा रूग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना तपासण्या तिप्पट केल्या आहेत. आता लसीकरणावर भर दिला जाणार आहे. गतीमान लसीकरणासाठी जास्तीत जास्त प्रतिबंधक लसीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिली. तसेच रूग्णसंख्या कमी होण्यासाठी ज्येष्ठ नागरीक, 45 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांनी उपलब्धतेनुसार लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी देसाई बोलत हेते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई, सीपीआरच्या बाहÎ संपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक, महापालिकेचे माता, बालसंगोपन अधिकारी डॉ. अमोल माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 10 दिवसांपुर्वी कोल्हापुरात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रतिदिन 20 हजारांपर्यत टेस्टींग वाढवण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय प्रयत्न करण्यात येत आहेत. अधिकारी, कर्मचाऱयांच्या मदतीने जिल्ह्यात रोज 28 ते 30 हजार तपासण्या केल्या जात आहेत, ही समाधानाची बाब आहे. राज्यात लसीकरणात कोल्हापूर आजही आघाडीवर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लस कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे उद्दिष्टानुसार लसीकरणावर मर्यादा आल्याचे सांगितले.
जिल्ह्याला प्रतिदिन 50 हजारांपर्यत लस राज्य शासनाने पुरवावी, अशी मागणी राज्याचे मुख्य आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे केली आहे. जास्तीत जास्त कोरोना लसी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सध्या उपलब्ध लस दिव्यांग, परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि तृतीयपंथिंयांना निश्चित दिवशी प्राधान्याने द्यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली. ज्या तालुक्यामध्ये नागरी व ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे जास्तीत जास्त लस देऊन ज्येष्ठ नागरीक आणि 45 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.