– एकूण रुग्णसंख्या 26 हजार 344, मृतसंख्या 804 वर
– 16 हजार 783 रुग्णांची कोरोनावर मात, 8 हजार 757 रुग्ण उपचारात
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात मागील 24 तासात कोरोनाचे 730 नवे रुग्ण आढळून आले. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 359 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 26 हजार 344 इतकी झाली आहे. तर मृत्यसंख्या 804 वर पोहचली आहे. आत्तापर्यंत 16 हजार 783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्हय़ातील विविध कोव्हीड केअर सेंटर, शासकीय, खाजगी रुग्णालये येथे 8 हजार 757 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्हय़ात वाढतच आहे. गुरुवारी 730 नवे रुग्ण आढळुन आले. यापैकी कोल्हापूर शहरात सर्वाधिक 178 तर त्या खालोखाल करवीर तालुक्यात 98 आणि हातकणंगले तालुक्यात 90 रुग्ण मिळून आले. आरटी पीसीआर आणि सीबीएनएए<टीद्वारे तपासणी केलेले 1898 तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामधील 1351 अहवाल निगेटिव्ह तर 472 अहवाल पॉझिटिव्ह आले. अँटिजेन टेस्टच्या 704 अहवालांपैकी 554 अहवाल निगेटिव्ह आणि 150 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर खाजगी रुग्णालये व लॅबमधील 108 अहवाल पॉझिटिव्ह आले.
शहर, हातकणंगले, करवीर, शिरोळमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्हा कोरोनाच्या समुह संसर्गाच्या उंबरठय़ावर आहे. शहरासह जिल्हय़ातील 12 तालुक्यांपैकी हातकणंगले, करवीर, शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे या तालुक्यांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत शहरात 8389, हातकणंगले 3078, करवीर 2861 आणि शिरोळ तालुक्यात 1497 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत.