प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी रात्री 8 वाजेपर्यत कोरोनाने सहा जणांचा बळी घेतला. यामध्ये कर्नाटकातील महिला, टोप येथील महिला, शहरातील देवकर पाणंद येथील महिला, इचलकरंजीतील तिघांचा समावेश आहे. या 6 बळींमुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 60 वर पोहोचली आहे. अन्य दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या स्वॅब रिपोर्टची प्रतिक्षा आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात 28 नवे रूग्ण झाले.
जिल्हय़ात करवीरसह चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यत 166 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत.
जिल्हय़ात सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यत कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कर्नाटकातील 75 वर्षीय वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील टोप येथील 45 वर्षीय महिला, कबनूर येथील 60 वर्षीय वृद्धा, इचलकरंजी येथील इंदिरानगरातील 65 वर्षीय वृद्धा आणि महादेवनगर येथील 62 वर्षीय वृद्ध तसेच कोल्हापूर शहरातील सरदार पार्क, देवकर पाणंद येथील 61 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. सीपीआरमध्ये दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
शहरात सायंकाळपर्यत 28 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. यामध्ये जवाहरनगर 4, लक्ष्मीपुरी 7 यादवनगर 3, कसबा बावडा 2, शाहूनगर 2, साळोंखेनगर, राजारामपुरी, पुईखडी, मिरजकर तिकटी, लक्ष्मीनगर कदमवाडी, संभाजीनगर, देवकर पाणंद, ताराबाई पार्क येथील व्यक्तींचा समावेश आहे. देवकर पाणंद येथील सरदार पार्कमधील वृद्धेचा कोरोनाने मृत्यू झाला. सोमवारी लॉकडाऊनमुळे शहरात शुकशुकाट होता. बँकासह अन्य कार्यालयांतही वर्दळ अत्यल्प होती.
जिल्हय़ात दुपारी 12 वाजेपर्यत 24 पॉझिटिव्ह रूग्ण हेते. यामध्ये शहरातील 9 आणि राधानगरी 7, शिरोळ 4 आणि हातकणंगले तालुक्यातील तिघांचा समावेश होता. दुपारी 2 वाजेपर्यत तीन टप्प्यात 67 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 14, पन्हाळा 9, कागल 8, हातकणंगले 7 आणि गडहिंग्लज तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली, कागलमधील गैबी चौक, गोरंबे, मांगुर, मौजे सांगाव, हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी, हुपरी, कबनूर, नागाव, करवीर तालुक्यातील गांधीनगर, उचगाव, गडहिंग्लज तालुक्यातील महागाव, हिरलगेतील व्यक्ती आहेत.
सायंकाळी 6 वाजता आलेल्या 72 पॉझिटिव्ह रूग्णांत चंदगड तालुक्यातील 41, इचलकरंजीतील 27, हातकणंगलेतील चौघांचा समावेश आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 166 वर पोहोचली आहे. चंदगड तालुक्यातील किरमारेवाडी, नंदुरे, हलकर्णी, माणगाव, सडेगुडाळे, धुमाळेवाडी, तांबिलवाडी, सुळये, वाघोली, सत्तेवाडी, आणूर, तुर्केवाडी, मजरे कार्वे, कडलगे, मौजे कौलगे येथील रूग्ण आहेत.