चंदगड, शाहूवाडीतील प्रत्येकी 5 रूग्ण, गडहिंग्लज 2, आजरा, हातकणंगलेतील प्रत्येकी एकाचा समावेश : जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 680 वर
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी रात्री 8 वाजेपर्यत कोरोनाचे 15 पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आले. त्यामध्ये शहरातील रंकाळा परिसरातील एका डॉक्टराचा समावेश आहे. गेली दोन दिवस पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली होती. रविवारी ती वाढल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. सद्यस्थिती जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 680 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी 5 आणि गडहिंग्लज तालुक्यातील 2, हातकणंगले, आजरा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.
जिल्हय़ात सकाळी 4 पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आले. दुपारी 10 तर सायंकाळी आणखी एक रूग्ण पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या 680 वर पोहोचली आहे. रविवारी सकाळपर्यत 665 रूग्णांपैकी 425 जणांना डिस्चार्ज मिळाला. तसेच 79 अहवालापैकी 4 पॉझिटिव्ह तर 72 निगेटिव्ह आले. यातील 3 पॉझिटिव्ह रिपिट आहेत, तसेच चारही पॉझिटिव्ह रूग्ण हे आजरा तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
दरम्यान दिवसभरातील 15 रूग्णांत चंदगड तालुक्यातील 3 महिला, 2 पुरूष, गडहिंग्लज तालुक्यातील 2 पुरूष, हातकणंगले तालुक्यातील 1 पुरूष, शाहूवाडी तालुक्यातील 3 पुरूष, 2 महिला, आजरा तालुक्यातील एक पुरूष आणि कोल्हापूर शहरातील एका पुरूषाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ परिसर सील
महापालिका हद्दीमध्ये रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ परिसरात डॉक्टर कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्ते सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोनाची लागण एका संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये महापालिका हद्दीतील रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता व त्याला जोडणारे इतर रस्त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. हे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केल्याची माहिती प्रांताधिकारी नावडकर यांनी दिली.
मौजे निगवे खालसा येथील प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश मागे
कोरोना संसर्गरोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करवीर तालुक्यातील मौजे निगवे खालसा येथे लागू केलेला प्रतिबंधित क्षेत्र आदेश करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी मागे घेतला आहे. मौजे निगवे खालसातील एकाचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले. त्याला डिसचार्ज मिळाल्याने प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱयांनी दिला आहे. त्यानुसार या गावातील प्रतिबंधात्मक आदेश मागे घेतला आहे.
कोल्हापूर जिल्हय़ातील कोरोना आकडेवारी
तालुका नवे रूग्ण आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना बळी
आजरा 1 4 2
भुदरगड 0 67 0
चंदगड 5 80 0
गडहिंग्लज 2 71 3
गगनबावडा 0 6 0
हातकणंगले 1 7 0
कागल 0 55 0
करवीर 0 14 0
पन्हाळा 0 25 1
राधानगरी 0 63 0
शाहूवाडी 5 174 1
शिरोळ 0 7 0
नगरपालिका 0 11 1
महापालिका 1 22 0
इतर 0 8 0
एकूण 15 680 8