प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गुरूवारी देशांतर्गंत प्रवास केलेल्या दीडशे जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 22 जणांचे स्वॅब घेतले आहेत. बुधवारी मिरजेला पाठवलेल्या स्वॅबपैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एकाचा स्वॅब नव्याने पाठवण्याची सुचना केली आहे. अद्यापी 6 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.
येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये देशांतर्गत प्रवास केलेल्या 110 जणांची तपासणी केली. त्यापैकी 10 जणांचे स्वॅब घेतले आहेत. इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये 11 जणांची तपासणी करून तिघांचे स्वॅब घेण्यात आले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात पाच जणांची तपासणी करून दोघांचे स्वॅब घेण्यात आले. ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सात जणांची तपासणी करून तिघांचे स्वॅब घेतले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 12 जणांची तपासणी केली. तिघांचे स्वॅब घेण्यात आले. ऍपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये दोघांची तपासणी करून एकाचा स्वॅब घेण्यात आला. अंतरंग हॉस्पिटल येथे तिघांची तपासणी करण्यात आली. हे स्वॅब मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सीपीआर हॉस्पिटलमधून मिरज येथे बुधवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी 23 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. खासगी लॅबनी पाठवलेले 15 स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. अद्यापी दोघा मृतांचे स्वॅब रिपोर्ट, संशयित सहा जणांचे स्वॅब रिपोर्ट प्रलंबित आहेत. सीपीआरमध्ये गुरूवारी नवीन 9 संशयित रूग्ण दाखल झाले. आंतररूग्ण विभागात 128 जण उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.