प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यत कोरोनाने 12 जणांचा बळी घेतला. सामुहिक संसर्ग वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गावोगावी, गल्लोगल्ली रूग्ण दिसून येत असल्याने कोरोनाची दहशत लॉकडाऊनमध्ये आणखी वाढली आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी आलेल्या 273 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील 97, चंदगड, पन्हाळा, शिरोळ, हातकंणगंले तालुक्यातील रूग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाने करवीर तालुक्यातील वसगडे येथील 72 वर्षीय वृद्ध, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील 48 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील 57 वर्षीय पुरूष आणि टोप येथील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शहरातील शिवाजी पेठेतील 48 वर्षीय महिला, गंगावेश कुंभार गल्ली येथील 65 वर्षीय वृद्धा, संभाजीनगर हिरा पार्क येथील वृद्धा आणि रंकाळा टॉवर परिसरातील वृद्ध तसेच गांधीनगर येथील दोघांचा कोरोनाने बळी घेतला. या 11 बळींमुळे कोरोना बळींची संख्या 106 वर पोहोचली आहे.
जिल्हय़ात आज सीपीआरमधून 21 जणांना डिसचार्ज दिला. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 1 हजार 157 झाली आहे. जिल्हय़ात सकाळी 10 वाजेपर्यत 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सायंकाळपर्यत आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीचा दिवसभरातील आकडा 11 झाला आहे. आजपर्यत कोरोनाने 106 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 2 हजार 395 ऍक्टिव्ह रूग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात सकाळी 10 वाजेपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 हजार 396 होती. रात्री आठपर्यत अनुक्रमे 32, 51, 13, 30, 36, 39, 48 15, आणि 9 या क्रमाने पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 258 झाली तर आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 हजार 667 वर पोहोचली आहे.
जिल्हाधिकार्यांकडून दुधगंगा वॉर्डची पाहणी अन् सुचना
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी सीपीआरला भेट दिली. त्यांनी सीपीआरमधील वेदगंगा इमारतीतील वॉर्डची पाहणी केली. तसेच वॉर्डमधील तुंबलेल्या शौचालयांची तातडीने स्वच्छता करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. याच इमारतीत पाईपद्वारे ऑक्सिजन देणारा वॉर्ड उभारला जात आहें. त्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. हा वॉर्ड दोन दिवसांत कार्यान्वित करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. सीपीआरमधील अतिदक्षता विभागांची पाहणी करून त्यांनी तेथील अडचणी जाणून घेतल्या.