प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी सायंकाळपर्यंत 35 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या 171 वर पोहचली आहे. पहिल्या टप्प्यात दुपारी पावणे चार वाजता 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये कोल्हापूर शहरातील 4 तर उर्वरीत कोरोना बाधित भुदरगड, इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, करवीर आदी भागातील आहेत.
जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. कोरोनामुक्तीच्या उंबरठय़ावर पोहचलेल्या कोल्हापूर जिल्हय़ामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. जिल्हय़ाबाहेरुन विशेषतः मुंबई, पुणे येथून आलेल्यांची संख्या मोठी आहे. संख्या वाढतच चालल्याने जिल्हय़ातील नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या 171 वर पोहचली असली तरी कोल्हापूर जिल्हय़ाचा रेड झोन मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.