प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी सायंकाळी 462 नवे कोरोना रूग्ण होते, पण त्यानंतर 5 तासांत 171 रूग्ण नव्याने पॉझिटिव्ह आल्याने संख्या 633 वर पोहोचली आहे. आजपर्यत एकाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आलेली ही उच्चांकी रूग्णसंख्या आहे. वाढलेल्या रूग्णांमुळे आजपर्यंतच्या कोरोना रूग्णसंख्येने सात हजारांचा टप्पाही रविवारी रात्री उशिरा ओलांडला. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7 हजार 76 झाली आहे.
दरम्यान, सायंकाळी 6 नंतर एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 201 झाली आहे. रविवारी कोरोनाबळींनी 200 चा टप्पाही ओलांडला आहे. सामुहिक संसर्गामुळे टेस्ट संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोल्हापूर शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये राजारामपुरी 82 वर्षीय वृद्ध, रंकाळवेश येथील 72 वर्षीय वृद्ध, बिंदू चौकातील 84 वर्षीय वृद्ध, जरगनगर येथील 54 वर्षीय पुरूष, न्यू माने कॉलनी येथील 79 वर्षीय पुरूष आणि शहरातील 70 आणि 72 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. इचलकरंजीत कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजीतील 73 वर्षीय वृद्ध, मुरमुंडे मळा येथील 60 वर्षीय वृद्ध, शिवाजीनगर येथील 65 वर्षीय वृद्ध आणि सुतार मळा येथील 72 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. याशिवाय हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील 81 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे दिवसभरातील कोरोना बळींची संख्या 13 झाली असून एकूण 200 बळी झाले आहेत.
जिल्हय़ातील 20 केअर सेंटरवर दिवसभरात 1 हजार 805 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 216 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 3 हजार 639 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 687 जणांचे स्वॅब रिपोर्ट मिळाले. त्यामध्ये 1 हजार 160 निगेटिव्ह आले आहेत. 67 रिपोर्ट प्रलंबित आहेत. दिवसभरात 462 नवे पॉझिटिव्ह रूग्ण समोर आले आहेत. शहरात 125 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. आजपर्यत 1 हजार 869 रूग्ण झाले आहेत. शहरात रविवारी कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या 46 झाली आहे.
दिवसभरात 205 जणांना डिसचार्ज, आजअखेर 3067 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात सायंकाळपर्यंत 1687 प्राप्त अहवालापैकी 1160 निगेटिव्ह तर 455 पॉझिटिव्ह आहेत. 39 अँन्टीजेन टेस्टपैकी 32 निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह असे 462 पॉझिटिव्ह आहेत. रविवारी 205 जणांना डिसचार्ज दिला. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 3067 झाली आहे. आजअखेर 3639 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली.
सायंकाळपर्यत पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा 9, भुदरगड 14, चंदगड 2, गडहिंग्लज 4, हातकणंगले 70, कागल 30, करवीर 82, पन्हाळा 29, राधानगरी 22, शिरोळ 16, नगरपालिका क्षेत्र 53, महापालिका क्षेत्र 125, इतर जिल्हा व राज्यातील 6 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिकानिहाय रुग्णसंख्या अशी : आजरा 152, भुदरगड 152, चंदगड 382, गडहिंग्लज 249, गगनबावडा 13, हातकणंगले 594, कागल 141, करवीर 788, पन्हाळा 293, राधानगरी 235, शाहूवाडी 269, शिरोळ 257, नगर पालिका क्षेत्र 1410, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 1869 असे 6804 आणि इतर 101 अशी 6905 रुग्णसंख्या आहे. पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 3067 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 199 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णांची संख्या 3639 इतकी आहे.