प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी रात्रीपर्यत शहरात कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. जिल्हय़ात अन्य 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 217 झाली आहे. नवे 620 रूग्ण समोर आले. 180 जण कोरोनामुक्त झाले. रविवारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो स्वॅब पेडिंग राहिले होते. त्याची तपासणी प्राधान्याने करण्यात येत आहे. चंदगडसह अन्य तालुक्यांत अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. त्यामुळे त्याचाही ताण आहे. रात्री उशिरापर्यत 50 टक्क्यांहून अधिक पेंडिंग स्वॅबची तपासणी करण्यात आली. दरम्यान, सीपीआर हॉस्पिटलमधील 3 डॉक्टर, एका पालिकेचे नगराध्यक्ष पॉझिटिव्ह आले आहेत.
कोल्हापुरात चौघांचा मृत्यू, बळींची संख्या 52 वर
शहरात मंगळवारी सदर बाजार येथील 67 वर्षीय वृद्ध, बागल चौक येथील 58 वर्षीय महिला, उत्तरेश्वर पेठ येथील 66 वर्षीय वृद्ध, शनिवार पेठेतील 57 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील बळींची संख्या 52 झाली आहे. करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथील 67 वर्षीय वृद्ध, पाचगाव येथील 70 वर्षीय वृद्धा, पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील 22 वर्षीय तरूणी, हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील शिरोळ रोड परिसरातील 70 वर्षीय वृद्ध, 56 वर्षीय महिला, रेंदाळ येथील 60 वर्षीय वृद्ध तर कागल तालुक्यातील मुरगुड येथील 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. 11 बळींपैकी 6 जणांचा सीपीआरमध्ये, एकाचा आयसोलेशन हॉस्पिटल, दोघांचा आयजीएम हॉस्पिटलमध्ये तर शास्त्रीनगर, कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दोघांचा मृत्यू झाला. आजपर्यत 217 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
सीपीआर हॉस्पिटलमधील 3 डॉक्टर्स पॉझिटिव्ह
शहरात दिवसभरात कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील नगर पालिकेच्या नगराध्यक्षांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सीपीआरमधील 3 डॉक्टर्स पॉझिटिव्ह आले. शहरासह संसर्गित तालुक्यांत हॉटस्पॉटमध्ये ऍटींजेन टेस्ट वाढवल्या आहेत. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमध्ये तीन मशिन्सवर स्वॅब तपासणी सुरू आहे. तांत्रिंक बिघाडामुळे प्रलंबित स्वॅब प्राधान्याने तपासले जात आहेत. तीन दिवस होऊनही रिपोर्ट न मिळाल्याने अनेकांनी विचारणा केली. रिपोर्ट न आल्याने रूग्णांवर उपचार कसे करायचे, अशा प्रश्न केला जात आहे.
भुदरगडमध्ये 56 तर हातकणंगलेत 58 नवे रूग्ण
दरम्यान, सायंकाळपर्यत 1 हजार 473 जणांची तपासणी करण्यात आली. तसेच 932 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 4 हजार 48 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हय़ात 362 नवे रूग्ण दिसून आले आहेत. यामध्ये आजरा 14, भुदरगड 56, चंदगड 4, गडहिंग्लज 16, हातकणंगले 58, कागल 3, करवीर 9, पन्हाळा 3, राधानगरी 1 आणि शिरोळ तालुक्यातील 1 आहे. नगरपालिका क्षेत्रात 69 नवे रूग्ण दिसून आले. कोल्हापूर शहरात दिवसभरात 108 नवे रूग्ण झाले. शहरातील आजपर्यतची रूग्णसंख्या 2 हजार 155 झाली आहे. जिल्हय़ात आजपर्यत 7 हजार 714 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत.दरम्यान, रात्री 10 वाजेपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढत 620 पर्यत पोहोचली.
दिवसभरात 180 जण कोरोनामुक्त
सायंकाळपर्यत 180 जणांना डिसचार्ज मिळाला, त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 3 हजार 449 झाली आहे. सायंकाळपर्यत 1 हजार 88 स्वॅब रिपोर्ट आले. त्यापैकी 643 निगेटिव्ह आहेत. 100 रिपोर्ट प्रलंबित आहेत. 362 पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
मृतांमध्ये शहरातील 4, इचलकरंजीतील 2,
मुरगुड, रेंदाळ, बोरपाडळे, मोरेवाडी, पाचगाव प्रत्येकी एकाचा समावेश, बळींची संख्या 217,
तांत्रिक बिघाडामुळे 2 दिवस रिपोर्ट पेडिंग,
ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने विचारणा,
पेडिंग स्वॅब तपासणीला लॅबकडून प्राधान्य,
सीपीआर हॉस्पिटलचे 3 डॉक्टर्स पॉझिटिव्ह
जिल्हय़ातील पालिका नगराध्यक्ष पॉझिटिव्ह
कोल्हापूर ः एकूण पॉझिटिव्ह रूग्ण ः 7714
एकूण कोरोनामुक्त रूग्ण ः 3449
उपचार घेणारे ऍक्टिव्ह रूग्ण ः 4048