सामुहिक संसर्गाने रूग्णांत सातत्याने वाढ, हातकणंगले तालुक्यात दिवसभरात 11 बळी
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी सायंकाळपर्यत 702 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 हजार 416 झाली आहे. दिवसभरात कोरोनाने 12 जणांचा बळी घेतला. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील 11 बळी आहेत. सामुहिक संसर्गामुळे रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. स्वॅब संख्या वाढल्याने अँटीजेन टेस्टची संख्याही वाढली आहे. सीपीआरमधील 4 डॉक्टरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईन केले आहे. दिवसभरात 162 जणांना डिसचार्ज दिल्याने कोरोनामुक्तांची संख्या 3 हजार 611 झाली आहे.
जिल्हय़ात मंगळवारी सायंकाळपर्यत 7 हजार 714 पॉझिटिव्ह रूग्ण होते. त्यानंतर मध्यरात्रीपर्यत त्यात 313 नव्या रूग्णांची भर पडली. बुधवारी सायंकाळपर्यत त्यात आणखी 389 रूग्णांची भर पडली. त्यामुळे 24 तासांत 702 नवे रूग्ण जिल्हय़ात दिसून आले. त्यातून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8416 झाली आहे. दरम्यान, जिल्हय़ात दिवसभरात 1 हजार 540 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 15 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 4 हजार 576 रूग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाने दिवसभरात मृत्यू झालेल्यांत इचलकरंजीतील सुदर्शन चौकातील 83 वर्षीय वृद्ध, नेहरूनगर येथील 65 वर्षीय वृद्ध, दत्तनगर येथील 76 वर्षीय वृद्ध, षटकोन चौकातील 40 वर्षीय पुरूष, विकासनगर येथील 64 वर्षीय वृद्ध यांचा आयजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथील 45 वर्षीय महिला, कबनूर येथील 65 वर्षीय वृद्ध, भादोले येथील 54 वर्षीय पुरूष यांचाही आयजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. जयसिंगपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये फुलेवाडी पाचवा स्टॉप येथील 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला तर सीपीआरमध्ये हुपरी येथील 29 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या 12 जणांच्या मृत्यूने कोरोना बळींची संख्या 229 झाली आहे.
जिल्हय़ात बुधवारी 1 हजार 197 स्वॅबची तपासणी करण्यात आली. अँटीजेनचे 144 रिपोर्ट आले. याद्वारे 435 स्वॅब निगेटिव्ह आले तर 702 नवे पॉझिटिव्ह रूग्ण समोर आले. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांत आजरा 16, भुदरगड 35, चंदगड 12, गडहिंग्लज 7, गगनबावडा 12, हातकणंगले 70, कागल 1, करवीर 61, पन्हाळा 12, राधानगरी 47, शाहूवाडी 46, शिरोळ तालुक्यातील 45 आहेत. याशिवाय नगरपालिका क्षेत्रात 140, कोल्हापूर शहरात 188 आणि अन्य जिल्हय़ांतील 10 आहेत. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 8 हजार 416 झाली आहे. तसेच 162 जणांना डिसचार्ज दिल्याने कोरोनामुक्तांची संख्या 3 हजार 611 झाली आहे. सध्या 4 हजार 576 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ातील एकूण पॉझिटिव्ह ः 8416
एकूण कोरोनामुक्त ः 3611
सक्रीय कोरोनारूग्ण ः 4576
एकूण कोरोना बळी ः 229