प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्यामुळे जिह्यात 20 ते 26 जुलैपर्यंत सात दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. 27 जुलै पासून 31 जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात आली असली तरी यामध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. व्यापारी आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परंतु, सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेमध्ये दररोज 50 टक्के मर्यादेपर्यंतच कर्मचारी उपस्थित ठेवणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे सूट दिलेल्या सर्व बाबींच्या सेवा व आस्थापना, दुकाने, उद्योगधंदे, व्यापार आदी ठिकाणी आस्थापना मालक, कर्मचारी किंवा ग्राहक म्हणून 60 वर्षे किंवा वरील व्यक्तींना वावर करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
सोमवारपासून लॉकडाऊन शिथील केले असून त्याबाबतची नियमावली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी रात्री जाहीर केली. अत्यावश्यक सेवेतील वाहने व प्रवासी वगळून उर्वरित सर्व कोल्हापूर जिह्यात येणारी व जिह्याबाहेर जाण्यास प्रवासी व वाहनांना तसेच साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी कार्यक्रमांना बंदी असेल. बंदी आदेशातून सूट दिलेल्या बाबी व सेवांसाठी नागरिकांना सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत जिल्हा अंतर्गत खासगी आस्थापनांमध्ये जाता येईल. बंदी आदेशाच्या कालावधीत माल वाहतूक व वैद्यकीय साधने व तातडी सोडून उर्वरीत सर्व प्रकारची वाहने व नागरिकांच्या जिह्या बाहेरील प्रवासास बंदी असेल. कोल्हापूर जिह्याच्या नजीकच्या जिह्यात प्रवासासाठी देण्यात आलेले दैनंदिन प्रवासी परवाने वैद्यकीय व अत्यावश्यक कर्मचारी वगळून स्थगित ठेवण्यात येत आहेत. बंदी आदेशाच्या कालावधीत सूट दिलेल्या बाबी वगळून दुकाने, व्यापारी आस्थापना, सेवा आदी कारणांसाठी एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींचा समुह एकत्र येण्यास बंदी असेल.
हे सुरु राहणार
-सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने, व्यवसाय, सर्व व्यापारी आस्थापना सुरु राहणार
-पहाटे 6 ते सायंकाळी 6 पर्यंत दूध व भाजीपाला विक्रीस परवानगी
– गॅस वितरण सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यत सुरु राहणार
-शासकीय मालवाहतूक
-मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य विक्री करता येणार
-शहरी व ग्रामीण भागातील उद्योगधंदे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग 50 टक्के कामगारांसह सुरु राहणार
-सर्व बँका,इन्शुरन्स कार्यालये सुरु राहणार
-पेट्रोल व डिझेल पंप सुरु राहणार
-सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवासी रिक्षा वाहतुकीस परवानगी
– सर्व शासकीय कार्यालये
सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱया आस्थापना.
सर्व बँक, बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी, इन्शुरन्स ऑफिस, वित्त पुरवठा आस्थापना, पोस्ट ऑफिस, पेट्रोल, डिझेल पंप सुरु राहतील.
– न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
– दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंटमिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील.
– सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, ऍम्ब्युलन्स व इतर वैद्यकीय बाबींशी संबंधीत व्यक्तींचा प्रवास व वाहतुकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
– वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.
– जीवनावश्यक सेवा व आस्थापना.
— दूध संकलन व वाहतूक सुरु राहील. (वेळेची मर्यादा नाही).
– किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, भाजीपाला व फळे विक्री सकाळी 6 ते सा 6 वा. पर्यंत सुरु राहील.
-व्यापारी आस्थापना सकाळी 9 वा. ते सायंकाळी 6 वा पर्यंत सुरु राहतील. परंतु सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे आस्थापनेतील कर्मचारी प्रती दिन जास्तीत जास्त 50 टवके पर्यंत पाळी-पाळीने उपस्थित असतील असे नियोजन करावे. (मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंटस्, केशकर्तनालये, ब्युटीपार्लर्स, सलून्स, स्पा, मसाज सेंटर, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस्, प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल इ. वगळून). मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील किराणा-धान्य विक्री व अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा सुरु राहतील.
– एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱया आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 6 वा. पर्यंत.सुरु राहतील.
– ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाया आस्थापना व सेवा सुरु राहतील.
-दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना सुरु राहतील
– शिव भोजन योजना व वंदे भारत योजनेंतर्गत कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरणा साठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सूरु राहतील. त्याच प्रमाणे ज्या लॉजेस किंवा निवारागृहामध्ये सध्या प्रवासी, कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्यांच्यासाठी अशी लॉजेस व निवारागृहे व त्यातील खाद्यगृहे अशा प्रवाशांपुरत्या मर्यादित स्वरुपात सुरु राहतील.
– कोल्हापूर जिह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱया माहिती तंत्रज्ञान आस्थापना 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
— ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खासगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाया माहिती तंत्रज्ञान आस्थापना 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
– ग्रामीण भागातील शेतीची कामे.
-माल वाहतूक.
-शैक्षणिक संस्थांची फक्त शिक्षणेत्तर, कार्यालयीन कामे कमीत कमी कर्मचाऱयांचे उपस्थितीत सुरु राहतील.
प्रवासी वाहने – खासगी दुचाकी (फक्त चालक), चार चाकी वाहने (चालक + दोन प्रवासी) व शहरांतर्गत ऑटो रिक्षा (चालक व दोन प्रवासी).
हे बंद राहणार
– विवाह, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदींसह सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रम
– हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग,
-केश कर्तनालये, शॉपिंग मॉल्स, मार्केट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा ब्युटी पार्लर
– सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी राहणार आहे.
-अंत्यसंस्कार, अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 10 नातेवाईक, नागरिक यांना हजर राहता येईल. मृत व्यक्तींच्या नजीकच्या व्यक्तींचे सांत्वन शक्यतो दूरध्वनीवर करण्याबाबत सुचित करण्यात येत आहे.