प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव कृष्णात तथा एस. के. माळी (वय 80, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे कट्टर, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केलेले माळी हे गेली सत्तावीस वर्षे जिल्हा सरचिटणीसपदावर कार्यरत होते. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन, संयोजन माळी यांच्या पुढाकाराने होत असे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने जुना, जाणता, पक्षनिष्ठ कार्यकर्ता गमावला आहे. माळी यांच्या निधनावर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
निम्मे आयुष्य काँग्रेस कमिटीत
गेल्या पंचवीस तीस वर्षांत स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीतील एस. के. माळी उपस्थित नाहीत असा एकही दिवस नव्हता. पक्षाच्या कामात कायम व्यग्र असणाऱया माळींचे सर्व नेत्यांनी आपुलकीचे संबंध होते. माळी साहेबांचे निम्मे आयुष्य काँग्रेस कमिटीतच गेले, असे काँग्रेस कार्यकर्ते प्रेमाने म्हणत. आता माळी पुन्हा काँग्रेस कमिटीत दिसणार नाहीत, ही कल्पना करवत नाही, अशी प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांनी दिली.