प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येऊनही तो कोरोनाप्रतिबंधासाठी न वापरता स्वताच्या तुंबड्या भरण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केले आहे. एकीकडे आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आणि टॅब वाटपासाठी शंभरजण एकत्र आले तर चालतात. मात्र ७० जणांची सर्वसाधारण सभा प्रशासन घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागातील ३५ कोटी रूपयांच्या खरेदीतील २५ कोटी रूपयांचा घोटाळा लपविण्यासाठीच व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेतल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. त्याचबरोबर सभेला उपस्थित राहण्यासाठी अध्यक्षांच्या दालनात येऊ न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बुधवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बजरंग पाटील हे होते. यावेळी उपाध्यक्ष सतिश पाटील, सभापती प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते.
सभेचा कोरम पुर्ण झाल्यानंतर सभेला सुरवात झाली. यावेळी विरोधी गटाचे अरूण इंगवले, विजय भोजे, राहूल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, शंकर पाटील, प्रसाद खोबरे, वंदना मगदूम, अनिता चौगूले आदी सदस्यांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना व्हरांड्यातच पोलीसांनी अडविले आणि आत जाता येणार नसल्याचे सांगितले. यावेळी सदस्यांनी पोलीसांशी हुज्जत घातली. मात्र त्यांना मज्जाव करण्यात आला. संतप्त झालेल्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत सताधाऱ्यांसह प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपचे गटनेते अरूण इंगवले यांनी सत्ताधाऱ्यानी आरोग्य विभागात केलेला घोटाळा लपविण्यासाठीच व्हीसीद्वारे सभा घेतल्याचा आरोप केला. त्याचबरोबर गेल्या पंचवीस वर्षात कुणाही सदस्याला सभेला येण्यास मज्जाव करण्यात आला नाही. मात्र सत्ताधाऱ्यांनी साऱ्या हद्दी पार करत पोलीस बळाचा वापर केल्याचा विरोधकांनी आरोप केला.