प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळपाणीपुरवठा विभागातील संगणक खरेदी घोटाळा आणि औषध भांडार विभागातील औषध निर्माता युवराज बिल्ले यांची रोखलेली वेतनवाढ तत्कालिन सीईओंनी कायम केल्याच्या मुद्यांवरून शुक्रवारी झालेली जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा गाजली. हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेमध्ये शिळ्या कढीला ऊत आणल्यामुळे जिह्यातील जनहिताच्या योजनांवर फारशी चर्चाच झाली नाही.
पाणीपुरवठा विभागातील सादीलवारचा चार टक्के निधी त्याच विभागासाठी खर्च करणे अपेक्षीत आहे. पण तत्कालिन सीईओ अमन मित्तल यांनी यामधील दीड कोटी रूपयांच्या निधीतून 168 संगणक व प्रिंटर खरेदी केले. विशेष बाब म्हणजे या खरेदी प्रक्रियेची पदाधिकाऱयांसह सर्व सदस्यांना कोणतीही माहिती न देता केली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी केवळ 5 संगणक हवे असताना एवढÎा मोठÎा प्रमाणात खरेदी केलीच अशी असा प्रश्न मागील स्थायी समिती सभेत उपस्थित केला होता. अनेक तालुका पंचायत समित्यांमध्ये अधिकारी दोनच आहेत, पण तेथे चार संगणक दिले आहेत. संगणक देण्याबाबत तालुकास्तरावरून कोणतीही मागणी नसतानाही ते दिले आहेत.
खरेदीची निविदा प्रक्रिया देखील शंकास्पद असून एकाच व्यक्तीच्या चार फर्मच्या नावे निविदा भरल्या आहेत. त्यामुळे या सर्व खरेदी प्रक्रियेची प्रधान सचिवांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मागील सभेत केली होती. त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय कार्यवाही केली असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. तर औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली असताना तत्कालिन सीईओ मित्तल यांनी पुन्हा कारवाई रद्द का केली ? असा प्रश्न सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी उपस्थित केला. या जुन्या प्रश्नांवर शुक्रवारची स्थायी सभा गाजली.
सध्या गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्यामुळे उपाध्यक्ष सतीश पाटील व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील सभेला गैरहजर होते. यावेळी सीईओ संजयसिंह चव्हाण, शिक्षण सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील यांच्यासह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.