कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका विकास संस्था गटात दोन साखर सम्राटांतील लढतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यामध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात लक्षवेधी लढत होती. यामध्ये राजेंद्र पाटील विजयी झाले. दरम्यान, लक्षवेधी ठरलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ९८ मते घेत या तालुक्यात आपण ‘किंग’ असल्याचे दाखवून दिले. या गटातून त्यांच्या विरोधात ‘दत्त-शिरोळ’ चे अध्यक्ष गणपतराव पाटील होते, त्यांना अवघी ५१ मते मिळाली.
दरम्यान, यालढतीमध्ये गटात गणपतराव पाटील यांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः रिंगणात उतरून ताकद लावली होती. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणूनही ते स्वतः दिवसभर बसून होते. या दोघांबरोबरच शेट्टी यांचीही या गटात प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यात अखेर यड्रावकर यांनी बाजी मारली. निवडणूक अर्ज भरताना मंत्री यड्रावकर यांनी आपण विजयी होण्याचा दावा केला हता तो खरा ठरला आहे.