प्रतिनिधी / कोल्हापूर
नॅश्नल टेस्टिंग एजन्सी तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर घेण्यात येणारी नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा आज दि. 12 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर पाच हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परीक्षेच्या एक तास अगोदर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे.
नीट परीक्षा कोल्हापुरातील केआयटी कॉलेज, भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील इंजिनिरिंग कॉलेज तळसंदे, वारणा महाविद्यालय, सायबर कॉलेज, न्यू मॉडेल हायस्कूल, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज, शांतीनिकेतन हायस्कूल, ताराराणी विद्यालय, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यासह 13 केंद्रावर ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. या परीक्षेला 720 गुणांसाठी 200 प्रश्न आहेत, त्यापैकी 180 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या चार विषयांसाठी ए व बी गटात विभाजन केले आहे.
ए गटामध्ये 35 प्रश्न विचारणारले जाणार असून, सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. ब गटात 15 प्रश्न विचारणार असून त्यापैकी 10 प्रश्न सोडवायचे आहेत. असे प्रत्येक विषयाचे 45 प्रश्न सोडवायचे आहेत. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना स्वत:चा फोटो, आधार कार्ड, ऍडमिट कार्ड, पोस्टकार्ड साईजचा फोटो घेवून येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उंच टाचेचे सँडेल, सुट-बुट, ओढणी, घड्याळ घालून येण्यास मनाई केली असून विद्यार्थ्यांनी एकदम साधा ड्रेस घालून परीक्षेला यायचे आहे. विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे.