उपचारासाठी उशिरा दाखल झाल्याने मृत्यूदराचा वाढला टक्का
कोरोना बळींचे डेथ ऑडीट सुरू : वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात 1 एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. जानेवारी ते मार्चपर्यत रूग्णसंख्या कमी होती. पण १ एप्रिल ते १० मे या काळात सामुहिक संसर्गातून रूग्णसंख्या वाढत गेली. गेल्या ४० दिवसांत कोरोनाचे वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण अन् कोरोनाने घेतलेले बळी यांचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची कारणमिमांसा अर्थात `डेथ ऑडीट’ वैद्यकीय तज्ञांकडून केले जात आहे. सद्यस्थितीत कोरोना मृत्यू दर ३.७ टक्क्यांवर आहे. तो कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात लसीकरण ५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. केंद्रावर लसीसाठी गर्दीही आहे. लसीकरणासंदर्भात जागृती हे यातील सकारात्मक चित्र आहे. तर गेल्या ४० दिवसांतील रूग्णसंख्या पाहता रूग्ण, मृत्यू संख्या वाढल्याचे धक्कादायक चित्र आहे. यात कोरोनाचा झपाट्याने होणारा संसर्ग, सप्ताहभरात गंभीर होणारे रूग्ण अन् अंतीम टप्प्यात उशिरा उपचारार्थ येत असल्याने मृत्यूचा दर वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रूग्ण ११ हजारांइतके आहेत. त्यापैकी ८० टक्के रूग्ण हे लस न घेतलेले आहेत, वैद्यकीय तज्ञांच्या पाहणीतून हे समोर आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे डेथ ऑडीट केले जात आहे. त्यात महसूल अधिकाऱ्यांपासून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर जबाबदारी आहे. यापुर्वी सीपीआरमध्येच डेथ ऑडीट केले जात होते. आता तालुकास्तरावर ते केल्याने जबाबदारी विभागली आहे. यातील तज्ञांनी मृत्यू दरामागे उशिरा उपचारार्थ येण्यामुळेच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच सक्रीय रूग्णांपैकी ८० टक्के रूग्ण हे लस न घेतलेले असल्याचे मतही नोंदवले आहे.
जिल्ह्यातील महिनाभरातील रूग्णसंख्येची स्थिती
०१ एप्रिल २०२१ | संख्या | एकूण | १० मे २०२१ | संख्या | एकूण |
कोरोना मृत्यू | ६ | १८१२ | कोरोना मृत्यू | ६१ | २७३१ |
कोरोना रूग्ण | ३६७ | ५४३९५ | कोरोना रूग्ण | ९२८ | ७८९५५ |
कोरोनामुक्त | ११६ | ५०३७३ | कोरोनामुक्त | ११८९ | ६५२७७ |
सक्रीय रूग्ण | २२१० | सक्रीय रूग्ण | १०९८७ |