प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी सीपीआरमध्ये म्युकर मायकोसीसचे 6 नवे रूग्ण दाखल झाले, त्यामुळे म्युकर मायकोसीसची एकूण रूग्णसंख्या 102 झाली आहे. सीपीआरमध्ये आजपर्यत 29 जणांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यातील 18 शस्त्रक्रिया या जीवनदायी योजनेतून झाल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत म्युकरचे 61 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 12 जणांना गुरूवारी डिसचार्ज देण्यात आला. खासगी हॉस्पिटलमध्ये 36 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चौघांना गुरूवारी घरी सोडण्यात आले. करवीरमध्ये 2 आणि कागल, शिरोळ, हातकणंगलेत प्रत्येकी 1 रूग्ण उपचार घेत आहे. सीपीआर हॉस्पिटलमधील म्युकर वॉर्ड फुल्ल झाला आहे. येथे 10 दिवसांत 29 म्युकर रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी 18 शस्त्रक्रिया या जीवनदायी योजनेतून झाल्या आहेत. खासगी हॉस्पिटल्समध्ये 4 रूग्णांवर जीवनदायी योजनेतून शस्त्रक्रिया झाल्या आहेत, अशी माहिती जीवनदायी योजना कार्यालयातून देण्यात आली.
जिल्ह्यात ऍम्पोटेरीसीन बी इंजेक्शन आली नाहीत..
जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडे म्युकर मायकोसीस रूग्णांसाठी आवश्यक असलेली ऍम्पोटेरीसीन इंजेक्शन येतात. कोल्हापुग्नरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून ती अन्य जिल्ह्यांना दिली जातात. सीपीआर हॉस्पिटलमधील ग्रामीण रूग्णालय अर्थात आर.एच.सेलकडे ही इंजेक्शन येतात. मागणीनुसार प्रत्येक रूग्णाला ही 5 इंजेक्शन दिली जातात. कंपन्यांकडून गुरूवारी आरोग्य विभागाला ही इंजेक्शन मिळाली नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांनाही ही इंजेक्शन मिळाली नाहीत. या इंजेक्शनसाठी आर एच. सेल कार्यालयासमोर दिवसभर नातेवाईकांची रांग होती, पण इंजेक्शन न मिळाल्याने त्यांची निराशा झाली.