खासगी हॉस्पिटल्सना रेमिडीसीव्हीरसाठी दोन समन्वय अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हात रेमिडीसीव्हीर इंजेक्शनचा आरोग्य विभागाकडे पुरेसा साठा आहे. त्याचा वापर इमर्जन्सीसाठी होत आहे. आरोग्य विभागाने 34 हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. दोन दिवसांत ती आरोग्य विभागाला मिळणार आहेत. दरम्यान, रेमिडीसीव्हीर इंजेक्शन खासगी हॉस्पिटल्सना देण्यासाठी जिल्हात दोन समन्वय अधिकारी नियुक्त केल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
राज्यासह जिल्हात कोरोना प्रतिबंधक लसीपाठोपाठ रेमिडीसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी या इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांनी आंदोलनही केले. जिल्हात गेली तीन दिवस या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. खासगी हॉस्पिटल्समध्येही या इंजेक्शनला मागणी वाढली आहे. परिणामी जादा दराने या इंजेक्शनची विक्री होत होती. काहींनी आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे ही इंजेक्शन देण्याची मागणी केली होती. आरोग्य विभागाकडे, शासकीय हॉस्पिटल्समध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. फक्त रूग्णांच्या गरजेनुसार इमर्जन्सीसाठी त्याचा वापर केला जात आहे.
जिल्हात सार्वजनिक आरोग्य विभागाने 34 हजार रेमिडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यापैकी किमान 80 टक्के इंजेक्शन बुधवारपर्यत आरोग्य विभागाला मिळणार आहेत. दरम्यान, जिल्हातील खासगी हॉस्पिटल्सना थेट त्यांच्या मेडीकल स्टोअर्समध्ये ही इंजेक्शन दिली जाणार आहेत. त्यासाठी दोघा जणांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.