प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातील मतदान केंद्रांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासाठी असलेले गरुडा ऍप' 50 टक्के
बीएलओ’ नी अपलोड करुन घेतले आहे. त्याचबरोबर मतदार याद्यांमधील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे कामही सुरु आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी सोमवारी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिली. तसेच जिल्ह्यातील मतदार यादीवर शंभर टक्के छायाचित्रे असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली.
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2022 च्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबईतून राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व्हीसी' द्वारे बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे सहभागी झाले होते. देशपांडे यांनी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारी अंतर्गत पेलेले काम व
स्विप’ मोहिमेचा जिल्ह्यातील नियोजनाचा आढावा घेतला. व्होटर हेल्पलाईन ऍपची प्रसार व प्रसिध्दा, गरुडा ऍपची सद्यस्थिती, या ऍपच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांकडून मतदान केंद्रांचे झालेले काम, मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण, प्रलंबित दावे व हरकती निकाली काढणे, त्रुटी विरहित मतदार यादी, मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदार यादीतील तांत्रिक चुकांची दुरुस्ती केली का ?याबाबत देशपांडे यांनी विचारणा केली.
यावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी कांबळे यांनी व्होटर हेल्पलाईनसंदर्भात मतदारांना आवाहन केले आहे, गरुडा ऍपची कार्यवाही सुरु असून 50 टक्के `बीएलओ’ नी हे ऍप डाऊनलोड केले असून त्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरु आहे, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण सुरु आहे, त्रुटी विरहित मतदार यादीतील 84 एंट्री निकाली काढल्या असून अवघ्या 7 शिल्लक आहेत, मतदार यादीतील प्रलंबित दावे व हरकती निकालात काढण्याचे काम सुरु आहे, मतदार यादीतील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे, तसेच जिल्ह्यातील मतदार यादीवर शंभर टक्के छायाचित्रे आहेत, अशी माहिती दिली.