2 हजार 416 केंद्रांवर 3 लाख 23 हजार बालकांना लसीकरण
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी, 31 जानेवारीला पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 5 वयोगटापर्यत 3 लाख 23 हजार 546 बालकांना 2 हजार 416 पोलिओ केंद्रातून पोलिओची लस पाजण्याचे नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली.
देशामध्ये 16 जानेवारी पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 17 जानेवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन आठवडे पुढे ढकलली होती. आता पल्स पोलिओची मोहीम रविवारी, 31 रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर, मास्क, ग्लोव्हज वापर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण, शहरी तसेच महापालिका विभागांतर्गत 2 हजार 416 केंद्रे आहेत. त्यांतर्गत 6 हजार 447 कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिह्यासाठी 4 लाख 46 हजार 300 पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत. जिह्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3 लाख 23 हजार 546 बालकांना रविवारी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिह्यातील सर्व बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बसस्थानके व रेल्वे स्टेशन्स येथे ट्रान्झीट व मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
जिह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांचे मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱयांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.