दिवसभरात 111 पॉझिटिव्ह , शहरात दिवसभरात 25 पॉझिटिव्ह रूग्ण
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी कोरोनाने शहरातील महिलेचा आणि हुपरी येथील एकाचा मृत्यू झाला. शहरातील साळोखेनगर येथील 63 वर्षीय वृद्धा, हुपरी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. इचलकरंजीत दोघांचा तर तळसंदेत एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 51 झाली आहे. जिल्हय़ात कोरोना बळींचे अर्धशतक झाले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यत 94 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची आजपर्यतची संख्या दोन हजार 244 वर गेली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळपर्यत 25 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. यामध्ये सम्राटनगर 3, विक्रमनगर 2, कसबा बावडा येथील 2, कदमवाडी 2, हॉस्पिटलमधील दोघे, उभा मारूती चौक शिवाजी पेठ, विश्वकर्मा सोसायटी जवाहरनगर, रेणू प्रेस्टिज शिवाजी उद्यमनगर, संभाजीनगर, मुक्त सैनिक वसाहत,, शिवाजी पार्क, राजारामपुरी, अंबाई टॅक, व्यंकटेश पार्क नागाळा पार्क, ताराबाई पार्क, साने गुरूजी वसाहत, राजाराम चौक वाशी नाका, तेली गल्ली मारूती मंदिर, मंजाई सरपंचवाडा येथील प्रत्येकी 1 रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हय़ात हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील 48 वर्षीय पुरूष, हुपरी येथील 52 वर्षीय पुरूष, इचलकरंजीतील षटकोन चौकातील 55 वर्षीय महिला आणि आवळे गल्लीतील 36 वर्षीय महिला, कोल्हापुरातील साळोखेनगर येथील 62 वर्षीय वृद्धेचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाने हे पाच बळी घेतल्याने बळींची संख्या 51 झाली आहे.
शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यत 50 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळपर्यत अनुक्रमे 31, 21 आणि 18 असे 70 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात शिरोळ तालुक्यातील 4, महापालिका क्षेत्रात 25, करवीर तालुक्यातील 15, चंदगड तालुक्यातील 23, हातकणंगले तालुक्यातील 15, कागल तालुक्यातील 3, पन्हाळा तालुक्यातील 6, गडहिंग्लज तालुक्यातील 8, आजरा तालुक्यातील 2, भुदरगड तालुक्यातील 2 आणि अन्य जिल्हय़ातील 1 आहे.