प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गुरूवारी सायंकाळी 5 वाजेपर्यत 24 तासांत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 353 झाली आहे. सायंकाळपर्यत 176 कोरोना रूग्णांना डिसचार्ज दिल्याने कोरोनामुक्तांची संख्या 5 हजार 166 झाली आहे. सायंकाळपर्यत 560 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 12 हजार 838 झाली आहे. दरम्यान, शनिवार पेठेतील सिटी सर्व्हे ऑफिस आणि सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालयाशी निगडीत आस्थापना 3 दिवस सॅनिटायझेशनसाठी बंद ठेवल्या आहेत.
जिल्हय़ात गुरूवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजी येथील 74 वर्षीय वृद्धाचा कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नागाळा पार्क येथील हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील चिकोडी येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच कागल येथील काळम्मावाडी वसाहतीतील 38 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. दसरा चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शाहूपुरी सहाव्या गल्लीतील 8 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, मंगळवार पेठेतील 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील वर्धमान चौकातील 60 वर्षीय वृद्धेचा, तोरणानगर येथील 72 वर्षीय वृद्धाचा, गुजर माळ येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. गुरू कन्नाननगर येथील 65 वर्षीय वृद्धा, सिद्धेश्वर हौसिंग सोसायटीतील 60 वर्षीय वृद्ध आणि हातकणंगले तालुक्यातील रूकडी येथील 65 वर्षीय वृद्धाचाही आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असता मृत्यू झाला. या 12 मृत्यूंमुळे कोरोना बळींची संख्या 353 झाली आहे.
जिल्हय़ात गुरूवारी सायंकाळपर्यत 2 हजार 365 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 255 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 7 हजार 318 पॉझिटिव्ह रूग्णांवर येथे उपचार सुरू आहेत. तसेच 176 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 5 हजार 166 झाली आहे. सायंकाळपर्यत कोरोना रूग्णांचे 845 अहवाल आले. यामध्ये 509 निगेटिव्ह असून 354 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेन टेस्टचे 675 अहवाल आले, त्यापैकी 587 निगेटिव्ह आले आहेत तर 88 पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह नवे रूग्ण 560 झाले आहेत. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 12 हजार 838 झाली आहे.
दरम्यान, सीपीआर हॉस्पिटलमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाशी निगडीत आस्थापनासाठी 4 कर्मचारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अधिष्ठाता कार्यालयातील सर्व आस्थापना बुधवारपासून तीन दिवस सॅनिटायझेशनसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. शनिवार पेठेतील पोस्ट ऑफीस शेजारील सिटी सर्व्हे कार्यालयातील दोघे जण पॉझिटिव्ह आल्याने हे कार्यालयही बंद ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली.