300 हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात, बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या सर्वांची चाचणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा भाविकांविना होणार आहे. केवळ 21 मानकऱयांच्या उपस्थितीत यात्रेस परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने जोतिबा डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून या मार्गावर कडेकोट पोलीस नेमला आहे. 1 पोलीस अधिक्षक, 4 पोलीस निरीक्षकांसह 300 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. बंदोबस्तासाठी असणाऱया सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांची कोरोना चाचणी घेवूनच त्यांना बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आले आहे.
जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज सोमवारी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ 21 मानकऱयांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार मध्यरात्रीपासूनच जोतिबा डोंगरावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी रविवारी जोतिबा डोंगरावरील बंदोबस्ताची पाहणी केली. जोतिबा डोंगराकडे येणारे तीनही रस्ते पोलीस बंदोबस्तासोबतच बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. मंगळवार रात्री पर्यंत हा बंदोबस्त तैनात राहणार आहे. दरम्यान बंदोबस्तासाठी असणाऱया सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांची अँटीजेन व आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्यात आली आहे. चाचणीनंतरच कर्मचाऱयांना बंदोबस्तासाठी रवाना करण्यात येत आहे. जोतिबा डोंगर परिसरातील सर्व ग्रामस्थांना डोंगराकडे येवू नये असे आवाहन केले आहे. नागरीकांनी संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
चाचणी बंधनकारक
बंदोबस्तासाठी असणाऱया सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱयांची आर.टी.पी.सी.आर व अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे. त्या सोबतच 21 मानकऱयांचीही चाचणी करण्यात आली आहे. चाचणी केल्याशिवाय डोंगरावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्त
1 पोलीस उपअधिक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 10 पोलीस अधिकारी, 80 पोलीस कर्मचारी, 10 स्ट्रायकिंग, 120 होमगार्ड
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार केवळ 21 मानकऱयांच्या उपस्थितीमध्ये चैत्र यात्रा होणार आहे. डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून भाविकांनी डोंगराकडे येवू नये. डोंगर परिसरातील नागरीकांनीही घराबाहेर पडू नये. असे आवाहन पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी केले आहे. – पोलीस उपअधिक्षक आर. आर.