दोघा दारुतस्करांना अटक मोटारी सहकर्नाटक बनावटीची लेक्सी थ्री एक्स दारु जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
टाकळीवाडी ( ता . शिरोळ ) येथील गुरुदत साखर कारखान्यानजीक अवैधपणे कर्नाटक राज्य बनावटीच्या लेगसी श्री एक्स दारुची वाहतुक करणारे दोन दारु तस्करासह मोटार पकडली . विजय दतात्रय सावंत, संदीप बबन वडर ( दोघे रा . सैनिक टाकळी ता . शिरोळ ) अशी त्यांची नावे आहेत . त्यांच्याकडून मोटार आणि लेगसी श्री एक्स दारु असा ४ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
शुक्रवारी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान होत आहे. या निवडणूकीमध्ये मतदारांना खुश करण्याकरिता दारुचे वाटप करण्यासाठी कर्नाटक राज्यातून टाकळीवाडी (ता . शिरोळ) मार्गे अवैधपणे मोटारीमधून दारु शिरोळ तालुक्यात नेण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पांडूरंग पाटील यांना बातमीदाराकडून समजली. त्यावरुन टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्यानजीक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावला. या पथकाने समोरुन येणारी भरधाव मोटार संशयावरुन अडविली. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये कर्नाटक राज्य बनावटीच्या लेगसी श्री एक्स दारू साठा मिळून आला. तो जप्त करीत दारुचे वाहतुक करणारे विजय सावंत, संदीप बहर या दोघांना अटक केली. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पांडूरंग पाटील, दुय्यम निरीक्षक राहुल गुरव, वर्षा पाटील, सुभाष कोले, विशाल आळतेकर, प्रसन्नजीत कांबळे आदीच्या पथकाने भाग घेतला.