नंदकुमार तेली / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरीवर्गाला उत्पादन कमी, बाजारभाव कमी मिळाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. त्यांना दर्जेदार बी-बियाणांमधून चांगले उत्पादन मिळून उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने डॉ. अर्चना अजित चौगुले यांनी संगणकावरील मायक्रो तपासणीतून दर्जेदार बी-बियाणांची निर्मीतीचे संशोधन करून गरुड भरारी घेतली असून कोल्हापूरच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या प्रकल्पाचे नाव `सिस्टीम फॉर सीड टेस्टींग’ असून त्याला गव्हर्मेंट ऑफ इंडियातर्फे गेल्या (ऑक्टोबर 2020) महिन्यात पेटेंट प्राप्त झाले आहे. हा पेटेंट पुढे वीस वर्षे त्यांच्याच नावावर अबाधीत राहणार आहे.
संशोधनासाठी जिर्मिनेशन व प्युरिटी अशा दोन टेस्ट
‘सिस्टीम फॉर सीड टेस्टींग’ या प्रकल्पाअंतर्गत अर्चना यांनी पायडी (भात) सीड्स, सोयाबीन, ग्राऊंड नट (भुईमुग शेंग) आदी बी-बियाणांची संगणकावर मायक्रो पातळीवर तपासणी केली. यामध्ये त्यांनी शेतामध्ये जे धान्य पेरतो त्याच्या सीड टेस्ट असतात. त्यापैकी सीड जिर्मिनेशन व सीड प्युरिटी अशा दोन टेस्ट करून दर्जेदार बियाणांच्या निर्मिती सिस्टीमचे संशोधन केले.
यासाठी डॉ.अर्चना यांना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्याताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोशाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, संचालक डॉ. गिरीश देसाई, डॉ. सुरेश एन.माळी, कॉलेजचे प्राचार्य डॉ.हरीष तिवारी आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
संशोधनासाठी चार वर्षांचे कठोर परिश्रम
सिस्टींम फॉर सीड टेस्टींग हा ग्रांट झालेला प्रकल्प 2014 साली फाईल केला होता. त्या प्रकल्पाला गव्हर्मेंट आपॅ इंडियातर्फे ऑक्टोबर 2020 मध्ये हिरवा कंदील मिळून पेटेंट प्राप्त झाला. या संशोधनासाठी त्यांनी चार वर्षे कठोर परीश्रम घेतले आहे. या संशोधनामुळे शेतकरी वर्गाला दर्जेदार बी-बियाणे मिळणार असून त्यांच्या उत्पादन वाढीस मदत होणार आहे. तसेच उत्पादन वाढ व दर्जेदार उत्पादनामुळे अप्रत्यक्षरित्या शेतकरीवर्गाला आर्थिक हातभार लागणार आहे. या सिस्टीमनुसार दर्जेदार बी-बियाणे उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
विद्यार्थी, एचओडी ते संशोधक शैक्षणिक प्रवास
बसंत-बहार टॉकीजजवळील दिप्ती पार्क येथील प्रकाश मुरलीधर सातपुते यांना तीन मुली यापैकी अर्चना ही ज्येष्ठ कन्या. अर्चना यांचे शालेय शिक्षण होलीक्रॉस स्कूल, ज्युनिअर कॉलेज विवेकानंदमध्ये तर इंजिनिअरींग पदवी कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये झाले. सध्या त्या पुण्यातील रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड रिसर्च या संस्थेत प्राध्यापक असून कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांना संशोधनामध्ये कुटुंबातून पती अजित व मुलगी इशा यांची मोलाची साथ लाभली. आई अलका या गृहीणी तर दोन बहीण पैकी एक राधिका पंडीत येथील श्रीनिवासीनी यात्री निवासच्या संचालिका तर दुसरी चंद्राणी बागडी यांनी लॉमधून पीएचडी केली असून शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.