प्रतिनिधी / कोल्हापूर
ताराबाई पार्कातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सदर बाजार चौकाकडे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीला समोरून आलेल्या मोटारीने जोरदार धडक दिली. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ऐनवेळी चुकविण्याचा प्रयत्नात चारचाकीही रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या पलीकडील बाजूस जावून पलटी झाली.
या अपघातामध्ये पुरुषोत्तम वासूदेव बालीगा ( वय ५८, रा. ई वॉर्ड घाडगे कॉलनी कदमवाडी) व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर नागरिकांनी जखमींना कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पण तत्पूर्वीच पुरुषोत्तम बालीगा यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. तर चारचाकी चालक नैतिक राहुल कर्नावट (रा. मुक्त सैनिक वसाहत) यांच्याही डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते ही जखमी झाले.