कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची आठवण
२ नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर झाला होता निकाल
नगरसेवकांनी सोशल मीडियावर मानले मतदारांचे आभार
संजीव खाडे / कोल्हापूर
सोमवार २ नोव्हेंबर २०१५ चा दिवस, आदल्या दिवशी रविवारी १ नोव्हेंबरला मतदान झाले. हजारो मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सोमवारी निवडणुकीचा निकाल लागला. कोल्हापूर महापालिकेच्या २०१५मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालाला सोमवारी २ नोव्हेंबर २०२० रोजी बरोबर पाच वर्षे पूर्ण झाली. यंदा कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली आहे. पण सोमवारी पाच वर्षांपूर्वीच्या विजयी गुलालाच्या आठवणींना, आनंदाला, जल्लोषाला उजाळा देत अनेक नगरसेवक, नगरसेविकांनी आपल्या मतदारांचे आभार मानले.
२०१५ मध्ये तत्कालिन आयुक्त पी. शिवशंकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली होती. त्याआधी नव्याने प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियाही राबविण्यात आली होती. आरक्षण काढताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने पुन्हा आरक्षण काढण्याची वेळ आयुक्त पी. शिवशंकर आणि मनपा प्रशासनावर आली होती. त्यानंतर ८१ प्रभागासाठी निवडणूक झाली. १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान झाले. दुसऱ्या दिवशी सोमवारी २ नोव्हेंबरला निकाल लागला. तेव्हा राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपचे कोल्हापूर महापालिकेवर झेंडा फडकविण्याचे स्वप्न भंगले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. काँग्रेसच्या २७, राष्ट्रवादीच्या १५, भाजप व ताराराणी आघाडीच्या ३२, शिवसेनेच्या ४ आणि इतर अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल राहिले. या घटनेला पाच वर्षे झाली. सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी पाच वर्षांपूर्वी निवडून आलेल्यांपैकी अनेक नगरसेवक, नगरसेविकांनी सोशल मीडियावर आठवणींना उजाळा देताना जल्लोषाची छायाचित्रे शेअर केली. मतदारांचे आभारही मानले.
आता कोरोनामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने १५ नोव्हेंबरनंतर महापालिकेवर प्रशासक येणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून समस्या, प्रश्न सोडविता येणार नाहीत, अशी खंत व्यक्त करत `वैयक्तिक पातळीवर आपण चोवीस तास मतदारांसोबत आहोत, फोन आणि व्हॉटस्-अप २४ तास सुरू राहिल’, अशी ग्वाही देत अनेक नगरसेविकांनी मतदारांना आश्वस्त केले. सोमवारी दिवसभर फेसबुक, व्हॉटस्-अप आदी सोशल मीडियावर फिरणारे नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांचे मेसेज आणि फोटो चर्चेचा विषय ठरले.