खासदार संजय मंडलिक यांची माहिती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी
प्रतिनिधी/कोल्हापूर
तळ कोकणला जावयाचे झाल्यास कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गाकडे पाहिले जाते. परंतू हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने खराब झाला असून कोल्हापूर ते तळेरे (सिंधुदूर्ग जिल्हा) दरम्यान रस्त्याची सुधारणा करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून निधीची मागणी केली होती. दरम्यान, मागणी केलेल्या रस्त्यापैकी कोल्हापूर ते कळे दरम्यान 16.44 किमी इतक्या लांबीच्या रस्त्याकरीता 171 कोटी रुपये मंजूर करत असल्याचे शुक्रवारी नितीन गडकरी यांनी पत्राव्दारे खासदार मंडलिक यांना कळविले आहे.
याबाबत खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर ते तळेरे हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व तळ कोकण यांच्यातील मोठा दूवा असून या रस्त्यावर पर्यटन, उद्योग आदी कारणांमुळे वाहतुक मोठÎा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या मजबुतीकरण व दुपदरीकरणाकरीता आवश्यक असणारा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेवून मागणी केली होती. या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देवून पहिल्या टप्यामध्ये कोल्हापूर ते कळे दरम्यान 16.44 किमी लांबीच्या तर दहा मीटर इतक्या रुंदीच्या काँक्रीट रस्त्याकरीता 171 कोटी रु. मंजूर केलेबद्दल कोल्हापूर जिह्यातील नागरीकांच्या वतीने गडकरी यांचे विशेष आभार.
निविदा प्रक्रियेनंतर कामाला प्रारंभ
पावसाळ्यामध्ये कोल्हापूर ते कळे या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे रस्ता वाहतुकीकरीता बंद होतो. ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्याठिकाणी पाण्याचा निचरा व्हावा याकरीता मोरी अथवा लहान पूल बांधण्यात येणार असून बालिंगा येथे भोगावती नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाला समांतर असा नविन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी जमिन लवकरच संपादित केली जाणार आहे. कामाची निविदा प्रक्रिया राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरु होणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.