इचलकरंजी / प्रतिनिधी
कोरोची येथील दिपक कोळेकर या युवकाच्या खूनातील मुख्य संशयीत आरोपी आकाश वासुदेव (रा. भोने माळ, इचलकरंजी) याचा न्यायालयाने मंजुर केलेला जामीन रद्द केला. त्याने मर्डरचे एक वर्ष पूर्ण, आता दुसर्या वादळाची तयारी… अशा आशयाचा व्हिडिओ मोबाईलवर स्टेटस् ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत, त्याचा कोळेकर खूनातील जामीन रद्द करावा. या विषयी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होवून न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज रद्द केला. दरम्यान जामीन रद्द केल्याची माहिती लागताच त्याने इचलकरंजीतून पलायन केले आहे.
इचलकरंजी येथील स्टेशनरोडवरील खंजिरे औद्योगिक वसाहतीच्या पेट्रोल पंपानजीक 10 डिसेंबर 2019 रोजी दिपक कोळेकरचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आकाश वासुदेव याच्यासह बाराजणांच्यावर गुन्हा दाखल करून, त्या सर्वाना अटक केली होती. हे सर्वजण जेलची हवा खाऊन सध्या जामीनावर बाहेर आले आहेत. या दरम्यान या गँगचा म्होरक्या वासुदेव याच्यावर 13 नोव्हेंबर रोजी गँगवारमधून खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा आपली गुन्हेगारी कारनामे सुरु ठेवून मोबाईलवर कोळेकरच्या खूनाच्या वर्षपूर्तीनिमीत्ताने मर्डरचे एक वर्ष पूर्ण, आता दुसर्या वादळाची तयारी अशा आशयाचा व्हिडीओ मोबाईलवर स्टेटस ठेवला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी तो तब्बल 1 महिन्याची कारागृहाची हवा खावून जामिनावर बाहेर आला. या दरम्यान पोलिसांनी वासुदेव याचा कोळेकर खून प्रकरणातील मिळालेला जामिन रद्द करावा. याबाबत न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्याचा मंजुर केलेला जामिन अर्ज रद्द केला, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.