पुलाची शिरोली/ वार्ताहर
दारात उभारून बुलेटचा हॉर्न वाजवला म्हणून नागाव ता. हातकणंगले येथील तरुणास कुर्हाड व लोखंडी गजाने मारहाण केली. विजय सुरेश कोळी ( वय २३, रा. कोळी माळ, नागाव ) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मधुकर कोळी, गजानन कोळी व रवी कोळी यांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागाव येथील कोळी माळ येथे ही दोन्ही कुटुंबे राहतात. ये – जा करण्याच्या रस्त्यावरून या दोन्ही कुटुंबात वाद आणि टोकाची ईर्षा आहे. गजानन कोळी याने रस्त्यावरच आडवी मोटारसायकल लावल्यामुळे विजय कोळी याने हॉर्न वाजवला. आमच्या दारात हॉर्न का वाजवलास म्हणून गजानन कोळी याने विजयच्या डोक्यात कुर्हाड घातली. तोपर्यंत मधुकर व रवी कोळी यांनी विजयला हाता – पायावर गजाने मारहाण केली. यामध्ये विजय कोळी गंभीर जखमी होऊन त्याचा डोक्यात आठ टाके पडले आहेत. याबाबत विजयच्या भावाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.