प्रतिनिधी / कोल्हापूर
मद्य खरेदीसाठी आलेल्या एका युवकाला महापालिका परिसरातील दारू दुकानाजवळ सोमवारी सायंकाळी बेदम मारहाण झाली. यातून दोन गटामध्ये जोरदार हाणामारी होवून दगडफेक झाली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तळीरामांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गेल्या ४० दिवसांपासून लॉक डाऊन मुळे मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. आज शहरामध्ये काही दुकाने सुरू झाली. तेथे मद्य खरेदीसाठी रांगा लागलेल्या होत्या. यातूनच काही जणांमध्ये धूसफूस सुरु होती. महापालिका परिसरात असलेल्या सुशिल वाईन्समध्ये दारू घेण्यासाठी रंकाळा स्टँण्ड परिसरातील एक युवक आला होता. तो ही रांगेत उभा होता. याच दरम्यान महाराणा प्रताप चौक परिसरातील युवक तेथे आले. त्यांची या युवकासोबत नजरानजर झाली. त्यातूनच त्यांनी या युवकाला काय बघतोस अशी विचारणा करुन बेदम मारहाण केली. पुर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्यामुळे दोन गटांमध्ये दगडफेक झाली. येथून मद्य घेऊन घाईगडबडीने निघालेल्या काहीजणांच्या बाटल्या या राड्यामध्ये फुटल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी तात्काळ दखल घेवून घटनास्थळी पोहचत सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.