प्रतिनिधी / धामोड
धामोड ( ता. राधानगरी ) येथील युनियन बँकेवर काल, मंगळवारी (दि7)रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यात चोरट्यांनी बँकेची तिजोरी, कॅश काऊंटर, लॉकर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळवल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र या घटनेत चोरट्यांना तिजोरी न फुटल्याने बँकेतील सर्व ऐवज सुरक्षित असल्याची माहिती बँकेच्या अधिकार्यांनी दिलीय. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील धामोड खोऱ्यातील चाळीस ते पन्नास गावासाठी धामोड येथे युनियन बँकेची शाखा आहे . नोकरवर्गासह शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार या बँकेतून होतो. ही बँक गेल्या वीस वर्षापासून राजू आळतेकर यांच्या इमारतीत तळमजल्यावर बाजार चौकात आहे .बॅंकेचे शटर उचकटले असून कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्याने याची वर्दी राधानगरी पोलिसांना देण्यात आली . राधानगरीचे पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे . बँकेच्या बाहेर असणारी सायरन केबल चोरट्यांनी तोडली आहे . श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपास करीत आहेत .