प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना वाढतोय.., कोरोनाशी निगडीत नवी लक्षणे पुढे येत आहेत. .चव जाणवत नाही.., गंध कळत नाही.. अगदी डायरीयाचा त्रास आहे… ही लक्षणे कोरोनाची असू शकतात.. त्यामुळे याकडे दुर्लक्ष नको.. सीपीआरमधील बेडची संख्या दुप्पट केलीय. आता तर येथे फक्त कोरोना पॉझिटिव्ह अन् संशयित रुग्णांवरच उपचार होत आहेत.. सीपीआर प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या चार महिन्यांत यशस्वी कामगिरी केली आहे.. आताही ही यंत्रणा 24 तास सक्रीय आहे.. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार होणार.. हे नक्की आहे.
सीपीआर हॉस्पिटल हा थोरला दवाखाना आहे. जिल्हा हॉस्पिटल आहे. आता तर हॉस्पिटल कोरोनासाठी आयसोलेटेड केले आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने उत्कृष्ट सेवा दिली आहे. तरीही कोरोनाची वाढती रुग्णसंख्या.. वाढते कोरोना बळी पाहता.. सामुहिक संसर्गाचे आव्हान.. मर्यादित मनुष्यबळात हॉस्पिटल पेलत आहे. साडेसहाशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना हायरिस्क रूग्णांसाठी अतिदक्षता विभागात 50 बेड होते, त्याची संख्या 64 वर नेली आहे. कोरोना रूग्णांसाठी 200 बेड होते, ही संख्याही 175 बेडनी वाढवली आहे. या दुप्पट यंत्रणेने आपण कोरोनावर निश्चितच मात करु, हा विश्वास वाढला आहे.
हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहे.. पण बेड शिल्लक नसल्याच्या कारणावरुन आता सीपीआरमध्ये उपचार झाले नाहीत, असे होणार नाही. प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात येईपर्यत येथे फक्त कोरोना रुग्णांवरच उपचार होणार आहेत, त्यासाठी हॉस्पिटल कटीबद्ध आहे. रिक्त बेडसंदर्भात माहितीसाठी समन्वयक नियुक्त केला आहे. त्यामुळे सीपीआर नसेल तर अन्यत्र रूग्णांसाठी बेड उपलब्ध होणार आहेत. रिक्त बेड इन्फर्मेशनसाठी स्वतंत्र कक्ष उघडला जाणार आहे.
सीपीआरमध्ये पुरेसा औषधसाठा आहे. दोन दिवसांत तो आणखी वाढेल. येथे हायरिस्क रुग्णांसाठी 40 व्हेंटिलेटर्स आहेत. आता आणखी एक अतिदक्षता विभाग खुला होत आहे. रुग्णांनी पूर्व आजाराची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांना द्यावी. हॉस्पिटलमध्ये येताना संबंधित आजारावरील औषधे सोबत आणावीत. त्यामुळे कोरोनाचे निदान अन् औषधोपचार जलद करणे शक्य होणार आहे. कोरोनाशी निगडीत नवनवी लक्षणे पुढे येत आहेत. यासंदर्भात गाईडलाईन्सही मिळत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याच्या लक्षणांना घाबरु नका.. यावर उपचार घ्या. अशक्तपणा असेल, चव नाही, गंध नाही.. याकडे दुर्लक्ष करु नका. जवळच्या कोविड केअर सेंटरशी संपर्क साधा. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे. खासगी हॉस्पिटल्सनीही पुढाकार घ्यावा. येणाऱया रुग्णांवर उपचाराला प्राधान्य द्यावे अन् माहिती प्रशासनाला द्यावी. या लढय़ात कोल्हापूरकर निश्चितच यशस्वी होतील. प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केल्यास कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.