वार्ताहर/शिये
निगवे दुमाला (ता. करवीर) येथील बारभाई तळ्यामध्ये मासे धरण्यासाठी गेलेल्या युवकांना आज, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मगरीचे दर्शन झाले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निगवे दुमाला येथील एकशिंगे मळ्याजवळ बारभाईचे नावाचे तळे आहे. हे तळे नदीपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या तळ्यातील पाणी ओढ्या मार्गे नदीत मिसळते. या भागात पावसाचे पाणी साचल्याने हा भाग दलदलीचा बनला आहे. त्यामुळे ही मगर पंचगंगा नदीतून या तळ्यात आली असण्याची शक्यता वन विभागाचे वनरक्षक कृष्णात दळवी व एस.एस.हजारे यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे या तळ्यात व नदीकाठाला कोणीही मासेमारी करण्यास जाऊ नये. परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही वनाधिकारी दळवी व हजारे यांनी केले आहे.तसेच बुधवारी सकाळी वनविभागाच्या वतीने त्या परिसराची पाहणी करणार असल्याचे सांगितले.