गडहिंग्लज उपविभागातील ग्रामपंचायत उमेदवार हैराण : ग्रामीण भागात इंटरनेट, मोबाईल रेंजमुळे अडचणी
रोहित ताशिलदार / गडहिंग्लज
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ११३ ग्रामपंचायत निवडणूका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारांनी आपल्या खर्चाची देयके ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही स्वरूपात शासनाकडे सादर करावी लागणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील सध्या इंटरनेट, मोबाईल रेंज आणि सर्व्हर डाउन आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने उमेदवारांना अडचणी निर्माण झाल्याने हैराण झाले आहेत. मतदान झाल्यापासून एका महिन्याच्या आत ऑनलाईन आणि ऑफलाईन बिले सादर करायची असल्याने उमेदवार धावपळ करत असल्याचे चित्र गडहिंग्लज उपविभागात दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदीसाठी उपयुक्त असलेल्या `टू व्होटर’ मोबाईल ऍपद्वारे निवडणूक आयोगाने यंदा पारंपारिक खर्च सादर करणाऱ्या पध्दतीला फाटा देत ऑनलाईन प्रणालीचा वापर केला आहे. निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांना ऑनलाईन खर्च करण्यासाठी खास `टू व्होटर ऍप’ विकसीत केले आहे. उमेदवारांसाठी ते आता डोकेदुखी ठरत असून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईनबरोबर ऑफलाईन सुध्दा कागदपत्र निवडणूक विभागाकडे एका महिन्याच्या आत सादर करावे लागणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९४८ नुसार उमेदवारांना निवडणूकीच्या निकालानंतर एका महिन्याच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. परंतू ग्रामीण भागातील मोबाईल रेंज, इंटरनेटला गती नसणे, सर्व्हेर डाउन असणे या तांत्रिक बाबाची माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार खर्च सादर करण्याच्या गोंधळाचे वातावरण झाले आहे. निवडणूकीत अनेक उमेदवार अशिक्षित आहेत. अनेकांना स्मार्टफोन सुध्दा हाताळता येत नाही. अशा स्थितीत निवडणूक झालेला खर्च टू व्होटर ऍपद्वारे सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याने रिंगणातील उमेदवारांची अडचणी वाढल्या आहेत.
निवडणूक लढवलेले अनेक उमेदवार युवा असून त्यांना ऑनलाईन प्रक्रियेची जाण आहे. असे असले तरी ऑनलाईन पध्दतीने निवडणूक खर्च सादर करताना ग्रामीण भागात मोबाईल रेंजचा प्रश्न असून इंटरनेट सेवा सुरळीत नाही. त्यामुळे खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. ही अडचण वेळीच सोडविण्याची आवश्यकत असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांच्यातून होत आहे.
निवडणुकीचा खर्च ऑनलाईन सादर करताना दमछाक होती आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते खर्च दाखल करण्यापर्यंत सर्व्हर डाउनचा फटका उमेदवारांना बसतो आहे. खर्च ऑनलाईन भरण्यासाठी पॅनेलप्रमूखावर जबाबदारी असल्याने सारी जमावाजमव करताना तारांबळ होते आहे. ऑनलाईन खर्चाची माहिती भरण्याची मुदत वाढवून मिळावी.
शशिकांत चोथे, पॅनेलप्रमूख हुनगिनहाळ
निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी झालेला खर्च ऑनलाईन पध्दतीने सादर करणे जिकरिचे ठरत आहे. त्यामुळे हा खर्च ऑफलाईन सादर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तांत्रिक गोष्टीमुळे शासनाने अडचणी समजून घेण्याची गरज आहे.
करवीर उथळे, तेरणी ग्रा. पं. सदस्य