वार्ताहर / नेसरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या विजयादशमीचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर यांनी दिली.
नेसरीच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व असून यंदाच्या दसऱ्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाचा गावातील दसरा अंत्यत साध्या पध्दतीने होत असल्याचे बघायला मिळत आहे. गावातील सर्वच मंदिरांना कुलूपे घातली गेली आहेत. तर विजयादशमी दिवशी पंचक्रोशीतील गावांतून पायी फिरणाऱ्या रवळनाथ व मसनाई देवीच्या पालख्या यावेळी विशेष गाडीतुन गावभेटीला जाणार आहेत पण त्या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार नसल्याचे याआधीच देवस्थान समितीने जाहीर केले आहे. तर नेसरीतील दसरा चौकात विजयादशमी दिवशी सायंकाळी वर्षानुवर्षे शिंदे-नेसरीकरांच्या वाड्यातून मानकऱ्यांच्या उपस्थितीत वाजत येत दसरा चौकात शमीच्या पानांची पूजा करत सोने लुटण्याचा कार्यक्रम उत्साहात मोठ्या संख्येने व्हायचा मात्र यावर्षी सीमोल्लंघनाचा हा सोहळा रद्दच करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे – नेसरीकर यांनी दिली आहे.
विजयादशमी दसराच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेसरी पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने यांनी नागरिकांना आवाहन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दसरा सीमोल्लंघन, सोने लुटणे धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. सर्वांनी यावर्षी दसरा घरीच राहून साधेपणाने करावा. पालखी नेमलेल्या चार लोकांनी वाहनातून सीमा व चव्हाट्यापर्यत नेवून परत मंदिरामध्ये सुरक्षित ठिकाणी पालखी ठेवावी. पालखी कोठेही थांबवणे व उतरवणे नाही. सर्वांनी मास्क व सुरक्षित अंतर ठेवावे. गावातील कोणत्याही महिलांनी पालखीमध्ये ओटी भरु नये हे नियम पाळत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.