प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड शिरढोण दरम्यान असणाऱ्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारुन एकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये इचलकंरजीतील अशोक दत्तोबा मांगलेकर (वय ५० रा. जवाहर नगर) या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले.
या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आल्यावर संबंधित व्यक्तीचा मृतदेह शोधासाठी वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांच्या पथकाला पोलिसांकडून पाचारण करण्यात आले. यावेळी वजीर रेस्क्यू फॉर्सच्या पथकाला काही तासातच नदीपात्रात शोधाशोध करून मृतदेह शोधण्यात यश आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी येथील जवाहर नगर परिसरात राहणारे सायझिंग धारक अशोक दत्तोबा मांगलेकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिरढोण कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावरुन पंचगंगा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली होती. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकातील जवानांनी नदीपात्रातील मृतदेह अवघ्या काही वेळातच शोधून काढला.
यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा करून कुरुंदवाड येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.