सुळे/ वार्ताहर
पणुत्रे गावचे विधमान सरपंच रंगराव पाटील यांनी या वर्षी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या आरोग्य व शैक्षणिक साहित्य खरेदीत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर वीस टक्के कमिशन घेऊन साठ हजार रुपयांचा ढपला पाडला आहे. असा आरोप विरोधी गटनेते सरदार शंकर पाटील यांनी कळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी सरदार पाटील म्हणाले. सरपंच रंगराव पाटील हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. यावेळी त्यांनी तीन लाख रुपये साहीत्य खरेदीत कोल्हापूर येथील एका दुकानामधुन साठ हजार रुपये कमिशन घेतल्याचे तेथील मालकाने सांगितले आहे. त्यांचा व्हिडीओ आहे. गेल्या तीन वर्षात विधमान सरपंच रंगराव पाटील यांनी गावातील विकास कामात कमिशनचा धंदा करून लाखो रुपयांचा ढपला पाडला आहे.तसेच सरपंचानी चौदाव्या वित्त आयोगातून कुंभार गल्लीतील गटाराचा आराखडा परस्पर बदलून सरपंचानी स्वता:च्या घराभोवती गटार बांधले आहे.
तसेच मागील सभेमध्ये सदस्यांनी विरोध करूनही घरफाळा वाढ केली आहे.मागील पाच वर्षात आमची सत्ता असताना विदयमान सरपंचांनी राष्ट्रीय पेयजल योजनेबाबत तक्रार करून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.याची चौकशी झाली मात्र यामध्ये काही तथ्य आढळले नाही. उलट रंगराव पाटील यांनी सत्तेवर येताच तीन लाख रुपयांचे कमिशन घेऊन ठेकेदाराला बील अदा केले. हा राखण्यानेच शेत खाल्याचा प्रकार आहे.यामुळे पणुत्रे गावच्या विकासासाठी भ्रष्ट विद्यमान सरपंचानी राजीनामा द्यावा. गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच्या कारभारांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी. यावेळी मारूती पाटील, कृष्णात पाटील, भिकाजी कांबळे, शिवाजी पाटील,नंदु कुंभार, कृष्णात बंडू पाटील, संजय कुदळे उपस्थित होते.