दोन बँका व पतसंस्था, बचत गटही लटकले, हात ऊसणी मोठी रक्कम उचलली
प्रतिनिधी / गडहिंग्लज
शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत गेली दोन वर्ष तयार कपडाचे दुकान घालून लाघवी बोलण्याने साऱ्यांना भूरळ घालणाऱ्या एका परप्रांतीय व्यापाऱ्याने सुमारे 40 लाखाहून अधिक रूपायाचा चुना लावून गडहिंग्लज मधून पोबारा केला आहे. यात दोन बँका, एक पतसंस्था, बचत गट याचबरोबर हात उसणे देणारे अनेक व्यापारी अडकले आहेत. आज दुकान उघडून तपासणी करताच केवळ कपडाचे रिकामे बॉक्स आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील बाजारपेठेत मोक्याची जागा अधिक भाडे मोजून या राजस्थानी व्यापाऱ्याने ताब्यात घेत तयार कपड्याचे दुकान घातले. हे दुकान इतरांना ‘लकी’ नसले तरी या व्यापाऱ्याला मात्र ‘लकी’ ठरले. या व्यापाऱयाने नियोजनबध्द फसवणूक केल्याची चर्चा आहे. स्थानिक बँकेबरोबरच अन्य एका सहकारी बँकेचे गोड बोलून कर्ज उचलले. ही रक्कम कमी पडली म्हणून आणखी एका पतसंस्थेला गळी घालत त्यांच्याकडून ही या व्यापाऱ्याने कर्ज उचलले. 30 लाखांच्या आसपास ही रक्कम असल्याची चर्चा आहे. त्यानंतर या व्यापाऱ्याने अनेकांना भूरळ घालत विविध स्थानिक व्यापाऱ्याकडून हात ऊसणी मोठी रक्कम उकळली. हे सार झाल्यावर भैरी मार्गावरील एका बचत गटाला हाताशी धरत अधिक व्याजाचे अमिष दाखवत तेथून ही 35 हजार इतकी रक्कम उचलली.
दुकान भरगच्च वाटत असल्याने साऱ्यांनी चौकशी न करता रक्कम देण्याचे धाडस केले. पण दसऱ्याच्या दरम्यान हा व्यापारी गडहिंग्लजातून `गुल’ झाला. याची कुणालाच माहिती नाही. गाळा मालकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्या व्यापाऱ्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला पण यश आले नाही. बँकाना ही माहिती समजली. मंगळवारी सकाळी या दोन बँकासह पतसंस्थेच्या प्रतिनिधीनी दुकानातील माल ताब्यात घेण्यासाठी दुकानाचे कुलूप काढून पंचनाम्याला सुरूवात केल्यावर निम्म्याहून अधिक दुकान रिकाम्या बॉक्सनी भरले होते. बॉक्स उघडताच हा प्रकार दिसून आल्यानंतर साऱ्यांनी कपाळला हात लावला. अखेर सर्वच माल आणि कर्जाऊ रक्कम घेवून हा व्यापारी परागंधा झाल्याचे समोर आले. सुमारे 40 लाखाहून अधिक रक्कमेला चुना लावल्याची चर्चा बाजारपेठेत होत होती. पण हा आकडा अधिक असल्याचे सांगितले जाते. पंचनामा करताना या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभर या फसवणूकीची चर्चा शहरात होताना दिसत होती.