वार्ताहर / पिंपळगाव
गडहिंग्लजवरून गारगोटीकडे चाललेल्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण मृत्यूमुखी पडले तर ट्रक बाजूच्या शेतात पलटी झाल्याने चालक व क्लीनर जखमी झाले. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पांगिरे (ता.भुदरगड) गावाशेजारी पेट्रोलपंपानजीक घडला.
गडहिंग्लजहुन कोरीवकाम केलेली दगडे घेऊन ट्रक गारगोटीकडे जात होता. ट्रक पांगिरे गावाशेजारी पेट्रोल पंपानजीक आला असता अचानक ट्रकचा पुढील ड्रायव्हर बाजूचा टायर फुटला. त्यामुळे ट्रक सरळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकला. त्यामुळे मोटरसायकलवरील युवराज परीट रा. ठिकपुर्ली (ता.राधानगरी) हे जागीच ठार झाले तर नंदकुमार गायकवाड रा. माजगाव (ता.राधानगरी) यांना जखमी अवस्थेत गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की ट्रक सरळ अंगावरून गेल्याने मोटरसायकलस्वार गंभीर अवस्थेत पडले होते. मोटरसायकलवरील दोघेजण गावाहून कामानिमित्त उत्तुरकडे चालले होते. तर ट्रक बाजूच्या शेतात पलटी होऊन सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.ट्रकचालक बाजीराव गायकवाड रा. गारगोटी हे जखमी झाले आहेत. याबाबत भुदरगड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे.