वार्ताहर / पाचगाव
पाचगावमधील केवळ दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून पाचगावची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. पाचगावमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 15 जुलै रोजी आढळला होता. त्यानंतर पाचगाव मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मंगळवारपर्यंत पाचगावमध्ये एकूण 392 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 363 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
आर. के. नगर रुमाले माळ येथील एकाच कुटुंबातील चोवीस व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या मात्र त्या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पाचगाव मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही घटले आहे. सोमवारी पाचगावात केवळ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. मंगळवारपर्यंत पाचगावमधील केवळ दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाचगाव ग्रामस्थांनी सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे पालन केले तर लवकरच पाचगाव कोरोना मुक्त होईल अशी आशा पाचगावचे माजी उपसरपंच सुशांत शेटगे यांनी व्यक्त केली.