वार्ताहर/पाटगाव
भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागामधील पाटगाव-तांबाळे पंचक्रोशीत कोरोनाचा कहर वाढतच असून, आज, शुक्रवारी पुन्हा या परिसरात 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. पाटगाव, बशाचामोळा येथील प्रत्येकी दोघांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांनी रेड झोनमधून प्रवास केला असून, सर्वजण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.
आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात पाटगाव येथील 37 वर्षीय तरुण आणि 58 वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे. या दोन्ही व्यक्तींची स्वॅब तपासणी गारगोटी येथील कोरोना सेंटरवर दि. 19 मे रोजी केली होती. या व्यक्तींसोबत पनवेल व चेंबूर येथून आणखी 12 जणांनी पाटगावपर्यंत प्रवास केला आहे. या सर्वांना पाटगाव येथील हायस्कूलमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते.
बशाचामोळा येथे वाशीवरून आलेले बाप-मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 35 वर्षीय व्यक्ती आणि 11 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. दि. 14 रोजी हे कुटुंब बशाचामोळा येथे आले होते. त्याना येथील शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, 19 रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाच्या संपर्कात हे कुटुंब आल्याने यांना गारगोटी येथे 20 मे रोजी तपासणीसाठी नेले होते. तेथे त्यानी स्वॅब दिला होता. दि. 25 रोजी या कुटुंबाला गारगोटीहुन पुन्हा बशाचामोळा येथे शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या दोघांच्या संपर्कात कुटुंबातील आणखी चौघाचा समावेश आहे.